2023 च्या 'भुताला' पळवून लावण्यासाठी टीम इंडियाने यंदा अहमदाबादमधील आपली राहण्याची जागाच बदलली आहे. गेल्या वेळी ज्या हॉटेलमध्ये संघ थांबला होता, तिथे यंदा पाऊलही न ठेवण्याचा निर्णय मॅनेजमेंटने घेतला आहे.
2023 च्या वनडे वर्ल्डकप फायनलच्या वेळी भारतीय संघ अहमदाबादमधील अलिशान 'आयटीसी नर्मदा' (ITC Narmada) या हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. पण त्या पराभवानंतर या हॉटेलच्या आठवणी संघासाठी वेदनादायक ठरल्या. म्हणूनच यंदा टीम इंडियाने ही परंपरा मोडीत काढली आणि संघाने आपला मुक्काम 'ताज स्कायलाईन' (Taj Skyline) या हॉटेलमध्ये हलवला आहे.
advertisement
पण तुम्हाला माहितीय का की ज्या ITC नर्मदा'मध्ये रहाणं टीम इंडियाने टाळलं त्या हॉटेलमध्ये रहाण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात? चला सविस्तर माहिती घेऊ.
टीम इंडियाने यंदा ज्या हॉटेलला टाळलं आहे, ते हॉटेल खरं तर लक्झरीचं दुसरं नाव मानलं जातं. विविध ट्रॅव्हल पोर्टल्सनुसार या हॉटेलचे काही खास पैलू खालीलप्रमाणे आहेत.
एका रात्रीचं भाडं
सामान्य दिवसांत इथल्या रूम्सचे दर साधारण 12,000 ते 15,000 रुपयांपासून सुरू होतात. मात्र, विश्वचषकाच्या फायनलसारख्या मोठ्या इव्हेंटवेळी हेच दर 60,000 ते 1 लाख रुपयांच्या घरात पोहोचतात.
प्रेसिडेन्शिअल सूट:
इथल्या सर्वात महागड्या आणि शाही सूटसाठी एका रात्रीचे तब्बल 75,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात.
आयपॅड कंट्रोल्ड रूम्स:
या हॉटेलमधील रूम्समधील लाईट्स आणि टीव्ही एका आयपॅडद्वारे नियंत्रित केले जातात.
स्वादिष्ट जेवण
इथे जगप्रसिद्ध 'दाल बुखारा' मिळणारे 'पेशावरी' हे रेस्टॉरंट आहे.
'काया कल्प' स्पा आणि अत्याधुनिक जिमची सुविधा इथे उपलब्ध आहे.
एवढ्या सुखसोयी असूनही, टीम इंडियाने केवळ 'मानसिक सकारात्मकता' जपण्यासाठी या आलिशान वास्तूकडे पाठ फिरवली आहे.
ड्रेसिंग रूमही बदलली
ज्येष्ठ पत्रकार विमल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाने केवळ हॉटेलच नाही तर स्टेडियममधील ड्रेसिंग रूम बदलण्याचाही निर्णय घेतला आहे. भारत नेहमी 'होम टीम'ची ड्रेसिंग रूम वापरतो, पण तिथेच 2023 ची हार आणि नुकताच झालेला साऊथ आफ्रिकेविरुद्धचा पराभव पचवावा लागला होता. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडिया 'व्हिजिटर्स' (Visitors) म्हणजेच पाहुण्या संघाची ड्रेसिंग रूम वापरणार आहे.
नशिबावर विश्वास की भीती?
टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया सध्या कमालीची 'अध्यात्मिक' आणि 'अंधश्रद्धाळू' दिसत आहे. मुंबईत झालेल्या सेमीफायनल वेळी चंद्रग्रहणामुळे टीमने आपला सराव उशिरा सुरू केला होता. आता अहमदाबादमध्येही हॉटेल आणि ड्रेसिंग रूम बदलून संघ कोणत्याही प्रकारचा 'अपशकुन' टाळू इच्छितोय.
मैदानावरील कामगिरी महत्त्वाची असतेच, पण क्रिकेट हा मानसिक खेळही आहे. जर हॉटेल आणि ड्रेसिंग रूम बदलून खेळाडूंच्या मनात विजयाचा विश्वास निर्माण होत असेल, तर ही रणनीती नक्कीच फलदायी ठरू शकते.
