फेरतपासणी होणार या भीतीनं अनेक महिलांनी या योजनेतून आधीच स्वत:हून माघार घेतली. तर काही महिला या फेरतपासणीनंतर अपात्र आढळल्या. आता या महिलांकडून सरकार पैसे वसूल करणार की नाही असा प्रश्न अनेकांना होता. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर बोलताना लाभार्थीच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर दिलं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत, पण त्यांच्या खात्यात जमा केलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.
advertisement
या महिलांच्या खात्यात जमा केलेले 450 कोटी रुपये परत घेतले जाणार नाहीत. दीड लाख महिला 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत, 1.6 लाख महिलांच्या नावावर चारचाकी गाडी आहे, तर काही 'नमो शेतकरी' योजनेच्या लाभार्थी आहेत. 2.3 लाख महिला या नमो शेतकरी आणि संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत.
ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत, त्यांना यापुढे कोणताही लाभ मिळणार नाही. त्यांचे अर्ज बाद केले जातील. त्यांना फेब्रुवारीपासूनचे हप्ते मिळणार नाहीत. डिसेंबरचा सहावा आणि जानेवारीचा सातवा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावर महिन्या अखेरीस आला होता. त्यामुळे यावेळी देखील फेब्रुवारीचा हप्ता महिन्याअखेर येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
काय आहेत निकष?
माझी लाडकी बहीण’ योजनेत विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या आणि निराश्रित महिलांना दरमहा 1,500 रुपये लाभ दिला जातो.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावं
कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन नसावे
सरकारी नोकरीत कोणी नसावे
राज्याच्या रहिवासी असाव्यात
अविवाहित महिलेचाही योजनेचा लाभ घेऊ शकतात
दुसऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेतला असेल तर मात्र लाभार्थींना पूर्ण रक्कम न मिळता नियमानुसार मिळेल