लाडकी बहिण योजना सध्या KYC च्या प्रक्रियेमध्ये अडकली आहे. लाखो लाडक्या बहिणींना आता KYC प्रक्रियेतून जावं लागत आहे. अशातच दिवाळी आता दोन आठवड्यावर आल्यामुळे दिवाळीचा हफ्ता कधी येईल, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. पण, आता लाडक्या बहिणीचा सप्टेंबर महिन्याचा हफ्ता 13 ते 15 ऑक्टोबरपर्यंत खात्यात जमा होणार आहे, असा आदेशच महायुती सरकारने काढला आहे.
advertisement
KYC नसेल तरी मिळणार हफ्ता
ज्या महिलांची लाडकी बहिण योजनेसाठी Kyc केली असेल किंवा केली नसेल तरी सप्टेंबर महिन्याचा हफ्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा सगळ्या बहिणींना मिळणार आहे. सध्या लाडकी बहिणीची वेबसाईट सुरळीत चालू नसल्यामुळे Kyc ची अट तुर्तास वगळण्यात आली आहे. वेबसाईट सुरळीत सुरू झाल्यावर सर्व महिलांना KYC करणे अनिवार्य असणार आहे.
OTP येत नसल्यामुळे KYC करण्यात अडचणी
दरम्यान, सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी KYC अनिवार्य केली आहे. पण KYC करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. E-KYC करताना OTP चं येत नसल्याचं उघड झालं. अनेक महिलांनी याबद्दल तक्रार केली आहे. याची खुद्द आदिती तटकरे यांना दखल घ्यावी लागली. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होईल, असं आश्वासन आदिती तटकरे यांनी दिलं होतं. त्यांनी ही माहिती ३ ऑक्टोबरला दिली होती. पण ५ दिवस उलटले तरी OTP ची अडचण कायम आहे. त्यामुळे आता दिवाळीच्या तोंडावर KYC प्रक्रियेला तुर्तास ब्रेक लागण्याची शक्यता आहे.