सोलापुरातील मुळेगाव तांडा येथे राहणाऱ्या महेश शिंगाडे यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी मामाच्या हॉटेलमध्ये मॅनेजमेंट केले. जवळपास त्यांनी सात ते आठ वर्ष त्या हॉटेलमध्ये काम केले. हॉटेलमध्ये काम करत असतानाच त्यांनी निर्णय घेतला की आपण स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू करायचा. काम करत करत त्यांनी मिळणाऱ्या पगारातून काही रक्कम बँकेत जमा करायला सुरुवात केली.
advertisement
जवळपास 3 ते 4 लाख रुपये जमा करून महेश यांनी सोलापूर - हैदराबाद महामार्गावर हॉटेल अंबिका 3699 या नावाने स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. महेश याच्या हॉटेलमध्ये बोकडाच्या मटणाची ढवरा थाळी अनलिमिटेड 249 रुपयांना मिळत आहे. तर या व्यवसायातून महेश हे महिन्याला सर्व खर्च वजा करून 80 ते 90 हजार रुपयांची कमाई करत आहेत.
महेश यांनी सोशल मीडियाचा वापर आपल्या हॉटेलच्या जाहिरातीसाठी वापर केला. सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून हॉटेलमध्ये खाण्यासाठी ग्राहक बोरामणी, मोहोळ, कुंभारी सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव, लातूर येथून सुद्धा ढवरा थाळीचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. सोलापूरकरांचा प्रतिसाद पाहता लवकरच 350 रुपयाला अनलिमिटेड नवीन थाळी सुरू करणार असल्याची माहिती महेश शिंगाडे यांनी दिली. एकेकाळी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाने आज स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू करून उच्च शिक्षित बेरोजगार तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.