मुंबई: शेअर बाजारात आज मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी बाजार उघडताच एक मोठी ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. सीएनबीसी-आवाजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेडचे प्रमोटर कुंजल पटेल कंपनीमधील 7.88 लाख शेअर्स विकण्याचा विचार करत आहेत.
advertisement
हे शेअर्स कंपनीच्या एकूण इक्विटीपैकी सुमारे 7% आहेत. या कराराची किंमत सुमारे 562 कोटी रुपये (67 दशलक्ष डॉलर) आहे. या व्यवहारासाठी किमान शेअरची किंमत 7,600 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. सोमवारी हा शेअर 7,777.50 रुपयांवर बंद झाला होता.
ब्लॉक डीलचे इतर तपशील
हा व्यवहार ब्लॉक डीलच्या माध्यमातून होणार आहे. ज्यासाठी नुवामा वेल्थ मॅनेजमेंटची (Nuvama Wealth Management) नियुक्ती करण्यात आली आहे. हा करार 8 सप्टेंबर रोजी सुरू होऊन 9 सप्टेंबरला बंद होईल. शेअर्सची विक्री 9 सप्टेंबर रोजी होईल आणि त्याचे सेटलमेंट दुसऱ्या दिवशी होईल. सध्या कुंजल पटेल यांच्याकडे कंपनीमध्ये 37.8% हिस्सा आहे.
लॉक-इन कालावधी
मिळालेल्या माहितीनुसार, विकल्या जाणाऱ्या सर्व 7.88 लाख शेअर्ससाठी दोन वर्षांचा लॉक-इन असेल. जर काही शेअर्स विकले गेले नाहीत. तर त्यांच्यावर एक वर्षाचा लॉक-इन लागू होईल.
शेअरची कामगिरी
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्सचा शेअर 1.18% च्या घसरणीसह 7,768 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात या स्टॉकने 2% पेक्षा जास्त घसरण नोंदवली आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये मात्र त्यात 16% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत स्टॉकने 25% घट दर्शविली आहे.
कंपनीची तिमाही कामगिरी
जून तिमाहीत कंपनीची कामगिरी काहीशी कमजोर होती. व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्सने 79.5 कोटी रुपयांचा नफा कमावला, जो मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास स्थिर राहिला. या काळात कंपनीची एकूण कमाई 1.1% ने घटून 423.6 कोटी रुपये झाली. EBITDA 2.8% ने घसरून 72.7 कोटी रुपये झाला आणि मार्जिन थोडे कमी होऊन 17.2% झाले. मात्र व्यवस्थापनाने सांगितले की- 1 एप्रिलपासून ऑर्डरच्या संख्येत 33% आणि मूल्यामध्ये 17% ने वाढ झाली आहे.