2018 नंतर त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला लहान प्रमाणावर सुरू झालेला हा उपक्रम आज मोठ्या उद्योगात परिवर्तित झाला आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळात अनेकांचे रोजगार बंद झाले असताना नितीन यांनी संधी ओळखत आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवून व्यवसायाला गती दिली. पारंपरिक कलाकुसर आणि सागवान लाकडाची टिकाऊ गुणवत्ता यामुळे त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळू लागली.
advertisement
नितीन सणस सागवान लाकडापासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करतात. त्यामध्ये आकर्षक बैलगाड्या, चौरंग पाट, मंदिरासाठी देवघर, दरवाजे तसेच इतर सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक बैलगाडी आकारमानानुसार तयार केली जाते. या बैलगाड्यांची किंमत साधारणपणे 12 हजार रुपयांपासून सुरू होते. कलात्मक डिझाइन, बारकाईने केलेली कोरीव कामे आणि मजबूत बांधणी यामुळे त्यांच्या उत्पादनांना वेगळी ओळख मिळाली आहे.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर हा त्यांच्या यशामागील महत्त्वाचा घटक ठरला आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी आपल्या उत्पादनांची माहिती आणि व्हिडिओ ग्राहकांपर्यंत पोहोचवले. परिणामी, महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांतून मागणी वाढू लागली. इतकेच नव्हे तर अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये स्थायिक भारतीयांकडूनही त्यांच्या सागवानी बैलगाड्यांना विशेष मागणी येऊ लागली आहे. पारंपरिक भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेली ही बैलगाडी परदेशातील भारतीयांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
व्यवसायाच्या वाढत्या मागणीमुळे पुण्यात पहिली शाखा सुरू करण्यात आली असून बेंगळुरूमध्ये दुसरी शाखा कार्यरत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत व्यवसायाने चांगली भरारी घेतली असून वार्षिक उलाढाल 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सातत्यपूर्ण गुणवत्ता, ग्राहकांचा विश्वास आणि वेळेवर पूर्तता यामुळे त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस विस्तारत आहे. लहानपणापासूनच मला बैल आणि गायींची आवड होती. त्या आवडीमुळेच या व्यवसायाची प्रेरणा मिळाली. कमी शिक्षण असले तरी मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तर यश मिळते, असे नितीन सणस सांगतात.
छंदातून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पारंपरिक कलांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाची जोड देत ग्रामीण भागातील तरुणही मोठा उद्योग उभा करू शकतो, हे नितीन सणस यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.