ही विक्री कंपनीच्या एकूण इक्विटीपैकी सुमारे 1.02 टक्के इतकी आहे. या व्यवहारानंतर इंडियन हॉटेल्समध्ये त्यांच्याकडे सध्या 1 कोटी 42.87 लाख शेअर्स उरले असून, त्यांची हिस्सेदारी जवळपास 1 टक्क्यांवर आली आहे. रेखा झुनझुनवाला यांचा एकूण पोर्टफोलिओ 45 हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा असून त्यात 27 कंपन्यांचे शेअर्स आहेत.
शेअरचा कमकुवत परफॉर्मन्स कारणीभूत?
advertisement
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, इंडियन हॉटेल्सच्या शेअरचा अलीकडील कमकुवत परफॉर्मन्स हा या निर्णयामागील प्रमुख घटक असू शकतो. गेल्या एका वर्षात बीएसई सेन्सेक्समध्ये सुमारे 6.5 टक्क्यांची वाढ झाली असताना, इंडियन हॉटेल्सचा शेअर मात्र सुमारे 17 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या सहा महिन्यांत आणि चालू वर्षाच्या सुरुवातीपासून (YTD)ही हा स्टॉक दबावाखालीच राहिला आहे. बाजाराच्या तुलनेत सातत्याने पिछाडीवर राहिल्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी इथून भांडवल काढून अन्य पर्यायांकडे वळवले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टाटा समूहावर विश्वास कायम
इंडियन हॉटेल्समधील हिस्सा कमी केला असला, तरी टाटा समूहाबाबत रेखा झुनझुनवाला यांचा विश्वास अबाधित आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा मोटर्स (सीव्ही आणि पीव्ही), टाटा कम्युनिकेशन्स आणि टायटन यांसारख्या आघाडीच्या टाटा कंपन्यांचा समावेश आहे. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, बहुतांश इतर गुंतवणुकीत त्यांनी आपली होल्डिंग कायम ठेवली आहे. अशा प्रकारची निवडक विक्री मोठ्या गुंतवणूकदारांकडून मुनाफावसूली किंवा जोखीम कमी करण्यासाठी केली जाते, ज्याला बाजारात ‘री-जिग’ असे म्हटले जाते.
दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर
शॉर्ट टर्ममध्ये दबावाखाली असला, तरी इंडियन हॉटेल्सचा दीर्घकालीन ट्रॅक रेकॉर्ड दमदार राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत या शेअरने सुमारे 443 टक्के, तर दहा वर्षांत तब्बल 550 टक्क्यांचा परतावा दिला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा शेअर आजवर ‘मल्टीबॅगर’ ठरला आहे.
