नेमकं गणित काय बिघडलं?
यामागे रशियाची बदललेली रणनीती आणि डॉलरचा वाढता प्रभाव ही मुख्य कारणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून सोन्याच्या दरात कमालीची तेजी होती. सोन्याचे दर 1 लाख 84 हजारहून अधिक दरांवर पोहोचले होते. मात्र, ३० जानेवारीनंतर किमतीत १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आणि गेल्या १५ दिवसांपासून बाजारात अनिश्चितता आहे. आता हा ट्रेंड घसरणीकडे झुकताना दिसत आहे.
advertisement
रशियाचा तो निर्णय ठरणार गेमचेंजर!
सोन्याचे भाव पडण्यामागे रशियाचा एक मोठा निर्णय कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. अमेरिकेसोबतच्या संघर्षामुळे रशिया आतापर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरचा वापर टाळत होता. मात्र, रशियन अर्थव्यवस्था अडचणीत आणण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना उत्तर देण्यासाठी रशिया पुन्हा एकदा डॉलरचा पूर्ण ताकदीने वापर करण्यास सज्ज झाला आहे. डॉलरची गरज पूर्ण करण्यासाठी रशिया आपल्या प्रचंड सोन्याच्या साठ्याची विक्री करण्याची शक्यता आहे. जर रशियाने मोठ्या प्रमाणावर सोने बाजारात काढले, तर जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होईल.
ब्रिक्स देशांची भूमिका महत्त्वाची
गेल्या सहा महिन्यांत जागतिक स्तरावर झालेल्या एकूण सोने खरेदीत भारत, चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. ट्रम्प प्रशासनाच्या व्यापार धोरणांमुळे हे देश डॉलरऐवजी सोन्याकडे वळले होते. मात्र, रशियाने डॉलर स्वीकारल्यास हे देशही सोन्याची खरेदी कमी करतील, असा अंदाज आहे. मागणी घटल्यास किमती साहजिकच खाली येतील.
२०२७ पर्यंत किंमत कुठे स्थिरावणार?
आर्थिक संशोधन संस्था 'ब्लूमबर्ग'च्या अहवालानुसार, भारतातील सोन्याच्या किमती ७०,००० ते ८०,००० रुपयांच्या दरम्यान येऊ शकतात. मात्र, ही घसरण एका रात्रीत होणार नाही. ही प्रक्रिया हळूहळू पार पडेल आणि २०२७ च्या अखेरीस सोन्याचे दर ८०,००० रुपयांच्या आसपास स्थिरावतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. रशिया-युक्रेन युद्ध थांबले आणि आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर पुन्हा स्थिरावला, तर सोन्यात मोठी 'करेक्शन' पाहायला मिळेल. त्यामुळे सध्या सोने खरेदीसाठी थोडा वेट अँड वॉच करणं फायद्याचं ठरू शकतं.
डिस्क्लेमर: या बातमीमध्ये दिलेली माहिती केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने आहे. हे कोणत्याही प्रकारचे गुंतवणूक सल्ले नाहीत. शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक फायद्यासाठी किंवा नुकसानीसाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही.
