भंडाऱ्याच्या रवींद्र गजबेंचा नाद खुळा! गुंठाभर जमीन नाही, तरी शेतीतून घरात येताय लाखो रुपये, नेमकं करताय काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : स्वतःच्या नावावर एक गुंठाही जमीन नसताना शेतीत यश मिळवता येतं का, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. मात्र या प्रश्नाचं ठोस आणि प्रेरणादायी उत्तर म्हणजे पवनी तालुक्यातील वडेगावचे रवींद्र गजबे.
मुंबई : स्वतःच्या नावावर एक गुंठाही जमीन नसताना शेतीत यश मिळवता येतं का, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. मात्र या प्रश्नाचं ठोस आणि प्रेरणादायी उत्तर म्हणजे पवनी तालुक्यातील वडेगावचे रवींद्र गजबे. जिद्द, सातत्य आणि अपार कष्टांच्या जोरावर त्यांनी भूमिहीनतेच्या मर्यादा ओलांडून शेतीत लाखोंची उलाढाल उभी केली आहे. त्यांचा हा प्रवास ‘शून्य ते शिखर’ असा म्हणावा लागेल.
भाड्याच्या शेतीतून उभा केलेला आत्मविश्वास
सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी उदरनिर्वाहाचं मोठं आव्हान समोर असताना रवींद्र गजबे यांनी हार मानली नाही. स्वतःची जमीन नसली तरी शेतीच करायची, असा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. पवनी–भंडारा मार्गावरील सिंधपुरी परिसरात आणि इतर ठिकाणी मिळून सुमारे दहा एकर जमीन त्यांनी भाड्याने घेतली. त्या मातीशी नातं जोडून, तिला आपल्या कुटुंबातील सदस्यासारखं जपलं. या नात्याला त्यांनी प्रामाणिक श्रमांची जोड दिली आणि शेतीत नवी उमेद निर्माण केली.
advertisement
पारंपरिकतेपलीकडे जाऊन केलेले प्रयोग
केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता गजबे यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला. मागणी असलेल्या भाजीपाला पिकांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी नगदी पिकांचे अचूक नियोजन केले. सातत्यपूर्ण उत्पादन, योग्य वेळेचं नियोजन आणि मेहनतीची जोड यामुळे त्यांच्या शेतीतून हळूहळू चांगला नफा मिळू लागला. आज त्यांच्या शेतात डोलणारी हिरवीगार पिके ही केवळ उत्पादन नाहीत, तर कष्टातून फुललेली स्वप्नं आहेत.
advertisement
मातीवर प्रेम असेल तर यश दूर नाही
शेतीसाठी फक्त मालकीची जमीन पुरेशी नसते; मातीवर प्रेम करणारे मन आणि कष्ट करण्याची तयारी असावी लागते, हे रवींद्र गजबे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. “माती कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही, फक्त तिला घामाचं पाणी द्यावं लागतं,” हा संदेश त्यांच्या कामातून स्पष्टपणे दिसतो. त्यामुळेच आज वडेगावसह परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या यशाकडे आदराने पाहतात.
advertisement
संसाराचा गाडा आणि स्वप्नांची पूर्तता
शेतीतून मिळालेल्या प्रामाणिक उत्पन्नातून त्यांनी आपल्या कुटुंबाचा संसार सावरला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कर्जाचा बोजा न घेता त्यांनी कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा या सर्व गोष्टी त्यांनी शेतीच्या उत्पन्नातूनच पूर्ण केल्या. आज जिथे अनेक तरुण शेती सोडून शहरांकडे वळत आहेत, तिथे रवींद्र गजबे यांनी शेतीतूनच समृद्धीचा मार्ग दाखवून दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 7:30 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
भंडाऱ्याच्या रवींद्र गजबेंचा नाद खुळा! गुंठाभर जमीन नाही, तरी शेतीतून घरात येताय लाखो रुपये, नेमकं करताय काय?






