मूळचे सातारा जिल्ह्यातील असलेले संतोष शिंदे हे व्यावसायिकरित्या इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करतात. महाबळेश्वर, सातारा, गोवा अशा पर्यटनस्थळी डेस्टिनेशन वेडिंगचे आयोजन करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. या कामादरम्यान त्यांना विविध ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच एका नव्या व्यवसायाची कल्पना त्यांच्या मनात आली.
एका मारवाडी कुटुंबाच्या लग्नाच्या कार्यक्रमात काम करत असताना त्यांनी संतोष यांच्याकडे एक विशेष मागणी केली. त्या कुटुंबाने लग्नातील पाहुण्यांसाठी 100 टक्के मिनरल वॉटरपासून तयार केलेला आईस गोळा हवा असल्याचे सांगितले. ही मागणी पूर्ण करण्यासाठी संतोष यांनी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र बहुतेक ठिकाणी विक्रेते बाहेरून बर्फ आणून गोळा तयार करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्वतः शुद्ध पाण्यापासून बर्फ तयार करून गोळा विकणारे फारच कमी असल्याचे त्यांनी अनुभवले. याच गोष्टीतून त्यांना एक नवीन संधी दिसली.
advertisement
संतोष शिंदे यांनी हा बाजारातील प्रश्न ओळखून त्यावर उपाय शोधण्याचे ठरवले. त्यांनी 2013 पासून 2017 पर्यंत देशभर फिरून संशोधन केले. भारतातील विविध शहरांमधील प्रसिद्ध गोळा विक्रेत्यांची चव, फ्लेवर्स आणि पद्धती त्यांनी पाहिल्या. त्यातून ग्राहकांना काहीतरी वेगळे आणि दर्जेदार देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या संशोधनानंतर 2017 साली कुल आईस गोळाची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गोळ्यासाठी वापरला जाणारा बर्फ. संतोष शिंदे स्वतः आरओ फिल्टर पाण्यापासून बर्फ तयार करतात आणि त्याच बर्फापासून गोळा बनवला जातो. त्यामुळे स्वच्छता आणि गुणवत्तेची खात्री मिळते. सध्या त्यांच्या दुकानात 30 पेक्षा अधिक फ्लेवर्स उपलब्ध आहेत. चिंच, इमली, काळाखट्टा, मलाई, ड्रायफ्रूट, चॉकलेट आणि नवरंग गोळा हे ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहेत.
ग्राहकांची वाढती पसंती पाहता कुल आईस गोळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ कोथरूड परिसरातीलच नव्हे, तर शहराच्या विविध भागांतून लोक खास हा गोळा खाण्यासाठी येतात. सध्या या व्यवसायात दहा जणांना रोजगार मिळाला असून व्यवसायही चांगला वाढत आहे. गोळ्याची किंमत सुमारे 60 रुपयांपासून सुरू होते.
संतोष शिंदे यांच्या मते, दर्जेदार आणि स्वच्छ खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न केल्यास ग्राहकांचा विश्वास पटकन जिंकता येतो. त्यांच्या या अनोख्या कल्पनेमुळे पारंपरिक आईस गोळ्याला आधुनिक आणि सुरक्षित रूप मिळाले आहे. दररोज साधारण 15 ते 25 हजार रुपयांची कमाई होत असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यातील या तरुणाच्या कल्पकतेमुळे स्थानिक खाद्यव्यवसायात एक नवीन ट्रेंड निर्माण होताना दिसत आहे.