म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडे कल वाढू लागला आहे. कारण त्यातून चांगला रिटर्न मिळत आहे. म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये जितक्या लवकर गुंतवणूक सुरू केली जाईल, तितका अधिक फायदा मिळतो. कारण दीर्घ काळाचा विचार करता तो फायदा खूप जास्त असतो.
कोणत्याही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानंतर एसआयपी सुरू केल्यानंतर थेट आपल्या बँक खात्यातून दर महिन्याच्या ठरावीक तारखेला ठरलेला रक्कम ठरलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. अगदी 100 रुपयांपासूनही एसआयपी सुरू करता येते. एसआयपीमधून सरासरी 10 ते 15 टक्के परतावा अर्थात रिटर्न मिळतो. एसआयपीमध्ये सातत्याने गुंतवणूक केल्यामुळे शेअर बाजाराच्या चढ-उताराची चिंता कमी होते. बाजार घसरला, तर जास्त युनिट्स खरेदी केली जातात आणि तेजी आली, तर कमी युनिट्स खरेदी केली जातात. त्यामुळे अॅव्हरेज कॉस्ट चांगली होते. एसआयपीमध्ये मिळणारं व्याज पुन्हा गुंतवता येईल. त्यामुळे दीर्घकालीन रिटर्न वाढतो. चक्रवाढ व्याजामुळे या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो. एसआयपीमध्ये गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नसते. एसआयपीच्या गुंतवणुकीची रक्कम कधीही वाढवता किंवा कमी करता येऊ शकते. तसंच, वेळ पडल्यास फंडातून केव्हाही पैसे काढता येऊ शकतात.
advertisement
दर महिन्याला 100 रुपयांची एसआयपी केली आणि वार्षिक 12 टक्के परतावा मिळाला, तर 20 वर्षांनंतर सुमारे 99,914.79 रुपयांचा निधी उभा राहू शकतो. दर दिवशी 100 रुपये अर्थात महिन्याला 3000 रुपयांची एसआयपी केल्यास 10 वर्षांत 6,97,017 रुपयांचा निधी उभा राहू शकतो. यात गुंतवलेली रक्कम 3,60,000 रुपये, तर अंदाजे कॅपिटल गेन 3,37,017 रुपये असेल. 20 वर्षांत 29,97,444 रुपयांचा निधी उभा राहील. यात 7,20,000 रुपये गुंतवणूक असेल आणि अंदाजे कॅपिटल गेन 22,77,444 रुपये असेल. 30 वर्षांमध्ये 1,05,89,741 रुपयांचा निधी उभा राहू शकतो. त्यात गुंतवणुकीची रक्कम 10,80,000 रुपये असेल, तर अंदाजे कॅपिटल गेन 95,09,741 असेल. 40 वर्षांत 3,56,47,261 रुपयांचा निधी उभा राहू शकतो. त्यात गुंतवणुकीची रक्कम फक्त 14,40,000 रुपये असेल, तर अंदाजे कॅपिटल गेन 3,56,47,261 रुपये असेल. म्हणजेच वयाच्या विसाव्या वर्षीपासून मासिक तीन हजार रुपयांची एसआयपी सुरू केल्यास आणि ती वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत कायम ठेवल्यास निवृत्तीच्या वेळी साडेतीन कोटी रुपयांचा निधी हाताशी असू शकेल. ही आकडेवारी सरासरी 12 टक्के वार्षिक परताव्याच्या दरावर आधारित आहे.
ही आकडेवारी एसआयपीची ताकद स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.