मॉर्गन स्टॅन्ली या संस्थेचं असं म्हणणं आहे, की अजूनही भारत हा असा बाजार आहे, की ज्याला हरवणं कठीण आहे. त्या संस्थेच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे, की मजबूत उत्पन्न, मॅक्रो स्थिरता आणि देशांतर्गत प्रवाह यांमुळे भारताच्या गुंतवणूक चित्रामध्ये काही विशेष अशी समस्या नाही. 2025मध्ये भारत हा सर्वांत चांगली कामगिरी करणाऱ्या बाजारांपैकी एक असू शकतो. मॉर्गन स्टॅन्लीने आपल्या रिपोर्टमध्ये सेन्सेक्सकरिता डिसेंबर 2025पर्यंत 14टक्के तेजीचा अंदाज वर्तवला आहे. त्याचं टार्गेट 93 हजारांपर्यंत पोहोचू शकतं. त्या व्यतिरिक्त या ब्रोकरेज फर्मने सेन्सेक्ससाठी सर्वोच्च टार्गेट एक लाख पाच हजार आणि सर्वांत कमी टार्गेट 70 हजारांचं असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
advertisement
2025 साली गुंतवणूकदारांनी सायक्लिकल सेक्टर, फायनान्शियल, कंझ्युमर ड्युरेबल्स, इंडस्ट्री आणि आयटी सेक्टरमध्ये अधिक लक्ष केंद्रित करावं, असा सल्ला मॉर्गन स्टॅन्लीने दिला आहे. त्या व्यतिरिक्त बाजाराची स्थिती पाहता स्टॉक पिकिंगची दिशा डिफेन्सिव्ह आणि लार्ज कॅप शेअर्सच्या तुलनेत स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सकडे वळवून त्यावर जास्त लक्ष देण्याचा सल्ला मॉर्गन स्टॅन्लीकडून देण्यात आला आहे.
मॅक्वेरीने 2025 साठी अशा काही प्रमुख शेअर्सची यादी दिली आहे, की ज्यात तेजी येण्याची शक्यता आहे. त्यात टीसीएस, एचडीएफसी बँक, एम अँड एम, सन फार्मा, पीएफसी, डेल्हिवरी या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. जे शेअर्स कमजोर होतील, अशा काही शेअर्सची यादीही मॅक्वेरीने दिली आहे. त्यात टेक महिंद्रा, झोमॅटो, एसबीआय, अपोलो हॉस्पिटल्स, अव्हेन्यू सुपरमार्केट्स बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
सीएलएसएने असं म्हटलं आहे, की भारतात सरासरीपेक्षा कमी आर्थिक वृद्धीचे संकेत मिळाले आहेत; मात्र सणासुदीच्या काळात विक्रीमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे, की भारतात आर्थिक व्यवहारांमध्ये काही कमजोरी पाहायला मिळाली आहे आणि विक्रीतही घट झाली आहे. सीएलएसएने भारताच्या संदर्भात मंदीच्या स्थितीबद्दल सतर्कता व्यक्त केली आहे.