कामकाजाच्या अखेरीला बीएसई सेन्सेक्स 1048.90 अंक म्हणजेच 1.36 टक्के घसरून 76,330.01 अंकांवर बंद झाला. एनएसईचा 50 शेअर्सचा निफ्टी हा इंडेक्स 345.55 अंक म्हणजेच 1.47 टक्के घसरून 23,085.95च्या पातळीवर बंद झाला.
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन आज, 13 जानेवारीला घसरून 417.28 लाख कोटी रुपयांवर आलं. 10 जानेवारी रोजी ते 429.67 लाख कोटी रुपये होतं. अशा रीतीने बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 12.39 लाख कोटी रुपयांनी घटलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तेवढी घट झाली आहे.
advertisement
सर्वाधिक घसरण झालेले शेअर्स
बीएसई सेन्सेक्सचे 30पैकी 26 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. झोमॅटोचा शेअर 6.52 टक्के घसरणीसह टॉप लूझर ठरला. पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, एनटीपीसी या शेअर्समध्ये 3.23 टक्क्यांपासून 4.09 टक्क्यांपर्यंतची घसरण पाहायला मिळाली.
फक्त चार शेअर्स तेजीत
बीएसई सेन्सेक्सचे फक्त चार शेअर्स आज हिरव्या रंगात म्हणजे तेजीसह बंद झाले. अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये 0.78 टक्क्यांची सर्वाधिक तेजी राहिली. त्याखालोखाल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंडसइंड बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स 0.03 टक्क्यांपासून 0.62 टक्क्यांपर्यंतच्या तेजीसह बंद झाले.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर आज घसरणीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक होती. आज एक्स्चेंजवर एकूण 4226 शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यांपैकी 527 शेअर्स तेजीसह, तर 3571 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 128 शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय सपाट बंद झाले. 117 शेअर्सनी आजच्या व्यवहारादरम्यान आपल्या 52 आठवड्यांतल्या उच्चांकी, तर 495 शेअर्सनी आपल्या 52 आठवड्यांतल्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.