अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांना एक इशारा दिला आहे. 'ग्रीनलँड' संदर्भात जर जूनपर्यंत करार झाला नाही, तर युरोपीय देशांवर २५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लावला जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. या राजकीय तणावामुळे जगभरातील गुंतवणूकदार घाबरले असून त्यांनी आपले पैसे सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्या-चांदीत वळवले आहेत.
चीनमध्ये चांदीची मागणी इतकी वाढली आहे की, तिथे चांदीचा भाव लंडनच्या बाजारपेठेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. चीनमध्ये चांदीचा साठा कमी होत चालला असून औद्योगिक वापरासाठी तिथले व्यापारी मोठ्या प्रमाणावर चांदी खरेदी करत आहेत.
advertisement
चांदी ही आता फक्त दागिने बनवण्यासाठी उरलेली नाही. सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक गाड्या आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये चांदीचा वापर अनिवार्य आहे. जगभरात 'ग्रीन एनर्जी'चे महत्त्व वाढत असल्याने चांदीची मागणी सतत वाढत आहे, पण त्या तुलनेत खाणींमधून होणारा पुरवठा कमी पडत आहे. तज्ज्ञांच्या मते, ज्यांनी कमी दरात चांदी घेतली होती, त्यांनी आता थोडा नफा पदरात पाडून घेण्याची ही चांगली वेळ आहे.
चांदी आता विक्रमी उच्चांकावर आहे, त्यामुळे आता एकदम मोठी रक्कम गुंतवणे जोखमीचे ठरू शकते. जर तुम्हाला दीर्घकाळासाठी किमान 5 ते 10 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल, तर जेव्हा कधी दर थोडे खाली येतील 2.85 ते 2.90 लाखांच्या आसपास, तेव्हा थोड्या-थोड्या प्रमाणात चांदी खरेदी करणे फायद्याचे ठरेल. मात्र तुम्ही आता जर चांदीतला नफा काढला नाहीत आणि चांदीचे दर पडले तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं असा दावा काही तज्ज्ञांचा आहे.
काही तज्ज्ञांच्या मते, ही दरवाढ इथेच थांबणार नाही. जर जागतिक परिस्थिती अशीच राहिली, तर चांदी 3,40,000 ते 4,00,000 रुपयांपर्यंत देखील मजल मारू शकते. मात्र, सध्या बाजार खूप अस्थिर असल्याने गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे चांदी विकायची की नाही ते तुम्ही स्वत: जोखीम घेऊन ठरवा किंवा तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणत्याही नफ्या तोट्यासाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही.
