गिफ्ट निफ्टी ३०० अंकांनी कोसळला
सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टीमध्ये ३०० अंकांहून अधिक मोठी घरात पाहायला मिळाली. इराणवर हल्ले सुरूच राहतील आणि यात ऊर्जा क्षेत्रालाही लक्ष्य केले जाईल, असे संकेत ट्रम्प यांनी दिल्याने गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. यामुळे आशियाई बाजार आपल्या उच्चांकी पातळीवरून खाली घसरले आहेत.
कच्च्या तेलाचा भडका आणि डॉलरची ताकद
advertisement
मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक ४ टक्क्यांहून अधिक उसळी आली आहे. १०० डॉलरच्या खाली असलेले ब्रेंट क्रूड आता १०६ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाचे दर वाढणे भारतासारख्या आयातदार देशासाठी चिंतेची बाब आहे. त्यातच डॉलर इंडेक्स वधारून १०० च्या जवळ पोहोचल्याने रुपयावरही दबाव वाढला आहे.
ऑटो क्षेत्रातील कंपन्यांची दमदार कामगिरी
बाजार अस्थिर असला तरी भारतीय ऑटो कंपन्यांनी मार्च महिन्याचे विक्रीचे आकडे समाधानकारक जाहीर केले आहेत. हीरो मोटोकॉर्प कंपनीची एकूण विक्री ९ टक्क्यांनी वाढून ६ लाख युनिट्सवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे निर्यातीत १५ टक्क्यांची मोठी झेप घेतली आहे. TVS मोटर्स कंपनीने वार्षिक तुलनेत २५ टक्के अधिक गाड्या विकल्या आहेत. आयशर मोटर्स रॉयल एनफिल्डच्या विक्रीत ११ टक्क्यांची वाढ झाली असली, तरी निर्यातीत मात्र ८ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे विनोद नायर यांच्या मते, भारतीय बाजाराने नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात सकारात्मक केली असली, तरी भू-राजकीय तणावामुळे बाजार कोणत्याही क्षणी दिशा बदलू शकतो. सध्या बँकिंग, मेटल आणि रिअल इस्टेट शेअर्समध्ये हालचाल दिसत आहे. मात्र, हाय बॉन्ड यील्ड आणि बाजारातील चढ-उतार पाहता, सध्या मोठ्या गुंतवणुकीपूर्वी जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
के जे फोर्जिंग्स ही ऑटो कंपोनंट बनवणारी कंपनी आपला ३६० कोटींचा आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारीत असून त्यांनी सेबीकडे कागदपत्रे जमा केली आहेत. ट्रम्प यांच्या विधानांमुळे मार्केटमध्ये सध्या 'वेळोवेळी सावध राहण्याचे' संकेत मिळत आहेत. बाजारातील ही अनिश्चितता येत्या काही दिवसांत गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षा पाहणारी ठरू शकते.
