मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मॉरिस नावाच्या या गुंडाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारामध्ये त्यांना 5 गोळ्या लागल्या. त्यांना तातडीने करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. तसंच गोळीबारानंतर मॉरिसने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा चिरंजीव अभिषेक घोसाळकर होते. या घटनेमुळे दहिसरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला आहे, ते मॉरिस भाईचं ऑफिस होतं.
advertisement
दोघांमध्ये आधी काय बोलणं झालं?
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यात आधी अनेक वाद होते मात्र दोघांमधील वाद संपवून हे दोघे एकत्र आले. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे गुरुवारी सायंकाळी मॉरिस भाईच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह आले होते. या लाईव्हमध्ये मॉरीस भाईने अभिषेक घोसाळकर यांचं स्वागत केलं आणि सर्व मतभेद विसरून आपण दोघे एकत्र आल्याचे त्याने सांगितलं. त्यानंतर दोघेजण त्यांच्या परिसरासाठी कोणत्या गोष्टी करणार आहोत? याविषयी त्यांनी माहिती दिली.
मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांनी बोलताना म्हटलं की, " एक चांगलं व्हिजन घेऊन आम्ही सोबत आलो आहोत. नवीन वर्षात लोकांचा फायदा कशात आहे हे लक्षात घेऊन आम्ही काम करू. आम्ही आज 300 लोकांना साडी आणि रेशन वाटण्याच कार्य केलं. तसंच 10 तारखेला मुंबई ते नाशिक, आणि नाशिक ते मुंबई ट्रिपसाठी बसेस पाठवणार आहोत. गणपत पाटील नगर, बोरिवली, आयसी कॉलनी, इत्यादी प्रभागातील लोकांची चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करू" असं त्यानं सांगितलं.
फेसबुक लाईव्हच्या शेवटी घोसाळकर म्हणाले की, " आमच्यामध्ये अनेक मतभेद होते परंतु हे मतभेद दूर करून आम्ही आता एकत्र आलोय आणि लोकांसाठी नक्कीच चांगलं काम करू. अजून पुढे एकमेकांसोबत खूप चांगली काम करायची आहेत ही तर फक्त सुरुवात आहे. आपण बाहेर जाऊ आणि कामाला सुरुवात करू. "
असं सांगून मॉरिसने घोसाळकर यांना फेसबुक लाईव्हमध्ये बोलायचं सांगितलं त्यानंतर पिस्तुल आणली आणि गोळीबार केला. एकूण 5 गोळ्या घोसाळकरांवर झाडल्या. त्यानंतर मॉरिसने स्वत: वरही गोळी झाडून आत्महत्या केली.
