पनवेल ते नवी मुंबई विमानतळ प्रवास आता जलद आणि परवडणारा
25 डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यानंतर विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एनएमएमटीने खांदेश्वर रेल्वेस्थानक ते विमानतळाच्या पूर्वेकडील कार्गो टर्मिनलपर्यंत बससेवा सुरू केली. ही बस करंजाडे उपनगरालगतून जात असल्यामुळे खांदेश्वर रेल्वेस्थानक आणि करंजाडे वसाहत यांना जोडणारी ही पहिली अधिकृत बससेवा ठरली आहे.
advertisement
प्रवासांचे अंतर किती मिनिटांत पूर्ण होणार?
यापूर्वी या मार्गावर कोणतीही थेट बस नसल्याने प्रवाशांना रिक्षांचा वापर करावा लागत होता. त्यासाठी 150 ते 200 रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागत होते. मात्र आता नव्या ए-5 क्रमांकाच्या एसी आणि बॅटरीवर चालणाऱ्या बससेवेमुळे प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. खांदेश्वर ते विमानतळाचा साडेसात किलोमीटरचा प्रवास अवघ्या 18 मिनिटांत पूर्ण होत असून कोणतेही सिग्नल किंवा अडथळे नसल्याने प्रवास जलद आणि आरामदायी होत आहे.
पहिल्या पाच दिवसांत या बससेवेचा लाभ एक हजारांहून अधिक प्रवाशांनी घेतला आहे. यामध्ये विमानतळ कर्मचारी तसेच करंजाडे परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. करंजाडे नोड, मोठा खांदेश्वर गाव आणि विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी उभारलेल्या आर पॉकेट वसाहतीलगतून ही बस धावत असल्याने अनेक भागांतील रहिवाशांना खांदेश्वर रेल्वेस्थानक गाठणे सोपे झाले आहे.
जाणून घ्या बस भाडे
सध्या सुरुवातीच्या टप्प्यात एनएमएमटीने तीन बस सुरू केल्या असून दिवसभरात 45 फेऱ्या घेतल्या जात आहेत. सकाळी साडेसहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. खांदेश्वर ते विमानतळ कार्गो प्रवेशद्वारापर्यंत तिकीट फक्त 15 रुपये असून खांदेश्वर ते करंजाडे नोडपर्यंत केवळ 10 रुपये भाडे आकारले जात आहे. या स्वस्त आणि सोयीस्कर बससेवेमुळे भविष्यात अधिकाधिक प्रवासी या सेवेचा वापर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
