सोनू बरई असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. मनीषा यादव असं हल्ला झालेल्या २४ वर्षीय तरुणीचं नाव आहे. या हल्ल्यात मनीषा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास केला जात आहे.
नेमकी घटना काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सोनू आणि जखमी मनीषा यांच्यात मागील काही काळापासून प्रेमसंबंध सुरू होते. पण सोनू हा वारंवार मनीषावर संशय घेत होता. याच कारणावरून दोघांमध्ये ८ दिवसापूर्वी वाद झाला. यातून त्यांच्यात ब्रेकअप झालं होतं. मनीषाने ब्रेक अप केल्याने सोनू प्रचंड संतापला होता. त्याने शेवटचं भेटण्यासाठी तरुणीला नर्सिंग होम परिसरात बोलावलं होतं. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी राग अनावर झालेल्या तरुणाने मुलीवर धारधार चाकुने वार केले. मुलीवर हल्ला केल्यानंतर त्याच शस्त्राने तरुणाने स्वत:चा गळा चिरून आयुष्य संपवलं.
advertisement
घटनास्थळी नक्की काय घडलं?
ब्रेक अप झाल्यानंतर आरोपीनं तरुणीला भेटायला बोलवलं होतं. यावेळी दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर आरोपीनं रागाच्या भरात तरुणीवर चाकुने हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी तरुणी नर्सिंग होममध्ये घुसली. पण आरोपीनं पाठलाग करत तिथे पुन्हा तिच्यावर हल्ला केला. तरुणीला रक्तबंबाळ केल्यानंतर आरोपीनं स्वतःचा गळा चिरून घेतला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मात्र जखमी तरुणीला जवळच्याच केईएम रुग्णालयात उपाचारासाठी हलवण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी पोलीस पथक पोहोचलं असून पंचनामा सुरू आहे. फॉरेन्सिक टीम्सही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबईच्या काळाचौकीसारख्या गर्दीच्या आणि दाटीवाटीच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने थरारक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
