कशी झाली व्यवसायाची सुरुवात?
व्यवसायाच्या सुरुवातीबद्दल बोलताना मंगल काकड सांगतात, आमचा एकत्र परिवार मोठा असल्याने रोज सुमारे 5 लिटर दूध लागायचे, ज्यामुळे महिन्याला 10 हजार रुपये दुधावर खर्च होत होता. या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गोसेवा व्हावी या उद्देशाने आम्ही घरात एक गाय आणण्याचा निर्णय घेतला. मंगल काकड यांना त्यांच्या माहेरच्या अनुभवामुळे गायीचे दूध काढण्याची कल्पना होती.
advertisement
घरातील गरज भागवूनही बरेच दूध शिल्लक राहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा मंगल यांनी शेजारच्या परिसरात दूध विकायला सुरुवात केली. आईचा हा रोजचा संघर्ष पाहून इंजिनिअर असलेल्या अभिषेकच्या मनात या दुधाला व्यवसायाचे स्वरूप देण्याची कल्पना आली. सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांनी या कल्पनेला विरोध केला, परंतु आईला असलेल्या अनुभवावर विश्वास ठेवून माय-लेकांनी एकत्र येऊन हा व्यवसाय करण्याचा निश्चय केला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
या यशाबद्दल बोलताना अभिषेक काकड सांगतात, सुरुवातीला आईने घरातील दुधासाठी एक गाय आणली होती, पण आज आमच्याकडे 20 ते 25 गायी आहेत. आता मला नोकरी करण्याची गरज राहिली नाही. नोकरीत मला जेवढा पगार मिळाला असता, त्यापेक्षा अधिक उत्पन्न मी माझ्या व्यवसायातून मिळवत आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतल्यामुळे अभिषेकने या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा खुबीने वापर केला आहे. त्याने फार्ममध्ये मिल्क पार्लरची स्थापना केली आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे एकाच वेळी 5 गायींचे दूध काढले जाते, ज्यामुळे मनुष्यबळाची गरज भासत नाही आणि कामगार-संबंधित अडचणी देखील येत नाहीत.
आज अभिषेक आणि मंगल काकड हे माय-लेक महिन्याला 5 ते 6 लाख रुपयांचे भरीव उत्पन्न मिळवत आहेत. भविष्यात हा व्यवसाय आणखी आधुनिक आणि मोठा करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. नाशिकच्या या माय-लेकांनी नोकरीच्या मागे न लागता, जिद्द आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी-आधारित व्यवसायात मोठे यश मिळवून इतरांसमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे.





