Ladki Bahin Yojana : 1500 रुपये लाभार्थी लाडक्या बहिणींची कमाल, राज्यात उभारली पहिली बॅंक, इतके पैसे जमा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार महिला बचत गटांसाठी जिल्हास्तरीय पतसंस्था अमरावती जिल्ह्यांत स्थापन करण्यात आली आहे.
अमरावती : शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार महिला बचत गटांसाठी जिल्हास्तरीय पतसंस्था अमरावती जिल्ह्यात स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत या संस्थेची बैठक पार पडली. तेव्हा त्यांनी सांगितले की, राज्यात जिल्हास्तरावर स्थापन केलेली अमरावती येथील पहिली लाडकी बहिणी महिला सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्र राज्यातील प्रथम जिल्हास्तरीय संस्था म्हणून नोंदणीकृत झालेली आहे. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेनुसार पात्र बहिणींना प्रतिमाह 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. या आर्थिक सहाय्याचा परिणामकारक वापर व्हावा आणि महिलांना अधिक स्थिर आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने माविमने जिल्ह्यातील लाभार्थ्यांना एकत्रित करत ही पतसंस्था उभारली आहे.
आतापर्यंत 15 लाख रुपयांचे भाग भांडवल जमा
पहिल्या टप्प्यात 7 हजार 500 लाडक्या बहिणींना संस्थेचे सभासदत्व प्रदान करण्यात आले आहे. प्रत्येक सभासदाकडून 200 रुपयांचे शेअर मूल्य जमा करून संस्थेने सुमारे 15 लाख रुपयांचे भागभांडवल उभे केले आहे. पुढील काळात सभासदसंख्या आणखी वाढणार असून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक व्यवहार, लघुउद्योग आणि बचतीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. सध्या जिल्ह्यात माविमच्या अखत्यारित 4 हजार 600 महिला बचत गट सक्रिय असून त्यामध्ये 46 हजार महिलांचा सहभाग आहे. या सर्व गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक कौशल्य, कर्जसुविधा आणि रोजगारनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
advertisement
संचालक मंडळाची निवड
लाडकी बहिणी महिला सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची निवडणूक 9 डिसेंबर रोजी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. ही निवड करण्यासाठी मतदान घेण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नव्या संचालक मंडळाला अधिकृत मान्यता दिली. निवडलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष रजनी पंडित भोंडे, उपाध्यक्ष रेशमा सरदार, कोषाध्यक्ष विद्या धिकार, सचिव ज्योत्स्ना चांगोले तसेच सुनीता थोटे, मीना कडव, अनिता वैद्य, पद्मा सरदार, भारती वानखडे, संमिता विरूळकर, विद्या काळे, कौसल्या इखे, शीतल डेहनकर आदी सदस्यांची निवड करण्यात आली. या प्रक्रियेसाठी सहकार विभागाचे मुख्य लिपिक प्रेमा नाखडे, वरिष्ठ लिपिक सुमित पाटील तसेच माविमचे अधिकारी ऋषीकेश घ्यार आणि डीपीसी हेमचंद गुप्ता यांचे विशेष सहकार्य लाभले.
advertisement
अमरावतीने केले राज्यात नेतृत्व
view commentsमाविमचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. रंजन वानखडे यांनी सांगितले, राज्यातील पहिली लाडकी बहिणी महिला सहकारी पतसंस्था अमरावतीमध्ये यशस्वीरित्या नोंदणीकृत करण्यात आली आहे. हा उपक्रम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमामुळे अमरावती जिल्हा राज्यात महिलांच्या सहकार चळवळीत अग्रेसर राहणार असून ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळणार आहे.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
December 12, 2025 4:29 PM IST
मराठी बातम्या/अमरावती/
Ladki Bahin Yojana : 1500 रुपये लाभार्थी लाडक्या बहिणींची कमाल, राज्यात उभारली पहिली बॅंक, इतके पैसे जमा







