आरोपींची नावे रवि अंजया कलिमारा, व्यंक्यया यदयया वैरु, जवाजी श्रीनिवास, रामलिंगच्या गज्जी, नरसिम्हा रामचंद्र कोलापल्ली, रजनी भास्कर बतुला आणि मंजुला रमेश जवाजी अशी आहेत. अटकेनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्वांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
दररोज घराघरात जाणारं दूध धोकादायक बनलं?
अंधेरीतील चार बंगला परिसरातील नवजीतनगर रहिवाशी संघातील काही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ केली जात असल्याची गोपनीय माहिती वर्सोवा पोलिसांना मिळाली होती. या भेसळयुक्त दुधाची परिसरात खुलेआम विक्री तसेच वितरण सुरू असल्याचेही समोर आले होते. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
advertisement
पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कांबळे, पोलीस शिपाई नसरुद्दीन इनामदार, किंजळकर आणि जाधव यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नवजीतनगर रहिवाशी संघातील तीन ते चार खोल्यांवर एकाच वेळी छापा टाकला. या कारवाईदरम्यान दुधात भेसळ करताना दोन महिलांसह सात जण रंगेहाथ आढळून आले.
छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध तसेच भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, उपकरणे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वर्सोवा पोलीस करत आहेत.
