भायखळा येथील प्राणी संग्रहालयातील शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला. प्राणी संग्रहालयात प्रशासन आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रसिद्ध न केल्याने शंका उपस्थित होत असून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान हे प्रकरण ताजे असताना आता आणखी एक वाघ बेपत्ता असल्याचा दावा केला जात आहे.
advertisement
सात दिवसांचा दिला अल्टिमेटम
राणीच्या बागेतील आणखी एक वाघ बेपत्ता झाल्याने भाजपचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांनी उपस्थित सवाल केला. रूद्र वाघाबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शक्ती वाघाच्या मृत्यू नंतर रुद्र वाघाबाबत शंका उपस्थित केली. सात दिवसांत भूमिका स्पष्ट केली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे. राणीच्या बागेत एकूण शक्ती, जय, करिश्मा आणि रुद्र असे चार वाघ होते. त्यातील शक्ती वाघाचा मृत्यू झाला मात्र अद्याप रुद्र वाघ कुठे आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
नेमकं काय म्हटलं आहे पत्रात?
प्राणिसंग्रहालयातील "शक्ती" नावाच्या वाघाचा मृत्यू न्यूमोनियाच्या संसर्गामुळे झाला आहे. परंतु मला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शक्ती वाघाचा मृत्यू हा श्वसन नलिकेत हाड अडकल्याने गुदमरून झालेला आहे. तसेच शक्ती वाघाचा मृत्यू 17 नोव्हेंबर रोजी झाला असताना, त्याबाबतचे अधिकृत निवेदन आपणांकडून 26 नोव्हेंबर रोजी म्हणजेच जवळपास एक आठवड्यानंतर जारी करण्यात आले. एखाद्या वन्य प्राण्याच्या मृत्यूची घटना इतका काळ दडवून ठेवणे हे अत्यंत गंभीर असून, ही गोपनीयता आपल्या प्रशासनातील दुर्लक्ष झाकण्यासाठी पाळली गेली का, असा संशय निर्माण होतो.
आपल्या निवेदनात आपण प्राणिसंग्रहालयात सध्या "जय" (वय 3 वर्षे) आणि "करिष्मा" (वय ११ वर्षे ६ महिने वर्षे) हे दोन वाघ असल्याचे नमूद केले आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे प्राणिसंग्रहालयात शक्ती, जय, करिष्मा आणि रुद्र असे एकूण चार वाघ प्रदर्शित करण्यासाठी उपलब्ध होते. शक्तीचा मृत्यू झाला, जय आणि करिष्मा उपलब्ध आहेत. परंतु "रुद्र" नावाचा वाघ सध्या कुठे आहे, याबाबत कोणतीही माहिती आपल्या निवेदनात नाही. रुद्र वाघाबाबत काही अनिष्ट घडले आहे का, याबाबत गंभीर शंका निर्माण होत आहे.
त्यामुळे रुद्र वाघाचा ठावठिकाणा तसेच शक्ती वाघाच्या मृत्यूचे वास्तविक कारण याबाबत आपणांकडून स्पष्ट माहिती देण्यात यावी. आपणाकडून वरील दोन्ही मुद्द्यांवर ७ दिवसांच्या आत समाधानकारक स्पष्टीकरण
प्राप्त झाले नाही तर भारतीय जनता पार्टी, भायखळा विधानसभा तर्फे या प्रकरणी सखोल
चौकशीची मागणी करत आंदोलन करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
