मुंबई : गेल्या काही वर्षात महिलांवर होत असलेल्या विविध गुन्ह्यांची उघड होत आहे. त्यात पुन्हा एकदा बलापूर शहरातून महिलांसंबधित घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरुन गेलेला आहे. या प्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखलही करण्यात आलेला आहे.
पैशांचे आमिष अन् गर्भाशयाचा बाजार
बदलापूर परिसरात घरातूनच महिलांची स्त्रीबीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
पैशांच्या बदल्यात महिलांची फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार सुलक्षणा जयवंत गाडेकर या महिलेने तिच्या घरात स्त्रीबीज वाढीसाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स बेकायदेशीररित्या साठवून ठेवली होती. आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना या प्रक्रियेसाठी तयार केले जात होते. कोणत्याही अधिकृत डॉक्टरांचा सल्ला न घेता सोनोग्राफी करून संबंधित इंजेक्शन्स दिली जात होती.
बेकायदेशीर स्त्रीबीज विक्रीने खळबळ
या इंजेक्शन्समुळे स्त्रीबीजांची वाढ झाल्यानंतर महिलांना IVF किंवा ART सेंटरमध्ये नेले जात होते. तेथे ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांची स्त्रीबीज काढली जात होती. त्यानंतर या स्त्रीबीजांची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेत महिलांचे शारीरिक आणि आर्थिक शोषण झाल्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचा खुलासा बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकाने केला. छाप्यात आरोपींच्या मोबाईलमध्ये इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफी अहवाल, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती आढळली. या रॅकेटचा तपास सध्या सुरू आहे.
