'या' विशेष ट्रेन होणार सुरु
मध्य रेल्वेने पनवेल-अलीपूरद्वार अमृत भारत साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला असून ही सेवा 23 फेब्रुवारीपासून नियमितपणे सुरू होणार आहे.
असे असेल वेळापत्रक
गाडी क्रमांक 11031 पनवेल-अलीपूरद्वार एक्स्प्रेस दर सोमवारी सकाळी 11.50 वाजता पनवेल स्थानकावरून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी दुपारी 1.50 वाजता अलीपूरद्वार जंक्शन येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 11032 दर गुरुवारी पहाटे 4.45 वाजता अलीपूरद्वारवरून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 5.30 वाजता पनवेल येथे येईल.
advertisement
हे आहेत थांबे
या गाडीचे थांबेही महत्त्वाचे आहेत. कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, प्रयागराज, पाटलीपुत्र, कटिहार आणि न्यू जलपाईगुडी अशा अनेक मोठ्या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील प्रवाशांना फायदा होईल.
आधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेवर विशेष भर
या एक्स्प्रेसमध्ये 11 जनरल डबे, 8 स्लीपर कोच, एक पॅन्ट्री कार आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन असतील. जनरल डबे जास्त असल्यामुळे आरक्षण नसतानाही प्रवास करण्याची चांगली संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जळगाव आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांसाठी ही गाडी विशेष सोयीची ठरणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दिलासा देणारा निर्णय
दरम्यान, पश्चिम रेल्वेने भुसावळ-दादर विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. दादर-भुसावळ साप्ताहिक आणि त्रिसाप्ताहिक विशेष गाड्या मार्च 2026 पर्यंत धावणार आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
