विवाहबाह्य संबंध की नात्यात दुरावा? पुण्यात वाढलं घटस्फोटाचं प्रमाण, धक्कादायक कारणं समोर, Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune News: पुण्यात 2026 मध्ये केवळ पहिल्या 45 दिवसांतच घटस्फोटाची 445 प्रकरणे दाखल झाली आहेत. दररोज सुमारे 10 नवीन अर्ज दाखल होत आहेत.
पुणे: आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात बदलती जीवनशैली, विभक्त कुटुंब पद्धती, संवादाचा अभाव आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव यामुळे घटस्फोटांच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालय येथे दररोज सरासरी 10 हून अधिक नवीन घटस्फोट अर्ज दाखल होत असून वर्षाकाठी चार हजारांपेक्षा अधिक प्रकरणांची नोंद होत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दाखल होणाऱ्या प्रकरणांपैकी सुमारे 45 टक्के घटस्फोट हे आपसी संमतीने घेतले जात आहेत. वाढत्या प्रकरणांमुळे कौटुंबिक न्यायालयांवरील कामाचा ताणही वाढत असून न्यायप्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होत आहे.
बदलत्या विचारसरणीचा परिणाम
ॲड. भालचंद्र धापटे यांच्या मते, घटस्फोट वाढण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत: बदलती विचारसरणी आणि पालकांचा अतिहस्तक्षेप. आज पती-पत्नी दोघेही मोठ्या कंपन्यांमध्ये कार्यरत, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि स्वतंत्र विचारांचे असल्याने नात्यात माघार घेण्याची किंवा समजून घेण्याची तयारी कमी होत चालली आहे. काही ठिकाणी पालकांचा अति हस्तक्षेप तर काही ठिकाणी पूर्ण दुर्लक्षही वाद वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे.
advertisement
शहरात एकत्र कुटुंब पद्धती कमी होत चालल्याने मोठ्यांचा सल्ला किंवा मध्यस्थी कमी झाली आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर, वैयक्तिक गोपनीयतेचा अभाव आणि विवाहबाह्य संबंध यांसारखी कारणेही पुढे येत आहेत.
तरुणांमध्ये वाढती प्रकरणे
25 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे विवाहानंतर एका वर्षाच्या आत घटस्फोट घेण्याचे प्रमाणही वाढताना दिसते. दुसरीकडे, 30 ते 40 वर्षांचा संसार केल्यानंतर, मुलं मोठी झाल्यावर विभक्त होणाऱ्या जोडप्यांची संख्याही वाढत आहे.
advertisement
सोशल मीडियामुळे आणि कायद्याविषयी वाढलेल्या जागरूकतेमुळे महिलांमध्ये अन्याय, कौटुंबिक हिंसाचार याविरुद्ध आवाज उठवण्याची प्रवृत्ती वाढली असून त्याचाही घटस्फोटांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
वाढती आकडेवारी
2026 मध्ये केवळ पहिल्या 45 दिवसांतच 445 प्रकरणे दाखल झाली आहेत. दररोज सुमारे 10 नवीन अर्ज दाखल होत आहेत. 2025 मध्ये 2380 प्रकरणे दाखल झाली होती, तर सुमारे 2500 प्रकरणे आपसी संमतीने घटस्फोटासाठी दाखल झाली होती. 2026 च्या पहिल्या 45 दिवसांतच 350 सहमतीने घटस्फोट नोंदवले गेले असून त्यापैकी 52 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
advertisement
पुण्यात एकूण 9 फॅमिली कोर्ट (प्रिन्सिपल कोर्टसह) कार्यरत आहेत. प्रत्येक न्यायालयाकडे दररोज सुमारे 50 ते 55 प्रकरणे असतात. दररोज सुमारे 500 ते 550 प्रकरणांवर सुनावणी घेतली जाते. मात्र, सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढणे शक्य होत नाही.
नांदायचे नाही आणि एकत्रही राहायचे नाही, फक्त पोटगीसाठी अशा प्रकारची प्रकरणेही वाढत असल्याचे ॲड. जान्हवी भोसले यांनी सांगितले. 2025 मध्ये अशा प्रकारची 200 प्रकरणे दाखल झाली होती, तर 2026 च्या पहिल्या 45 दिवसांतच 58 प्रकरणांची नोंद झाली आहे.
advertisement
भारतामध्ये कुटुंब व्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. घटस्फोटांचे वाढते प्रमाण ही पारंपरिक कुटुंब पद्धतीसाठी चिंतेची बाब ठरत आहे. याचा परिणाम पुढील पिढ्यांच्या विवाहसंस्थेविषयीच्या दृष्टिकोनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, नातेसंबंध टिकवण्यासाठी संवाद, समजूतदारपणा आणि परस्पर आदर या मूल्यांची जपणूक करणे काळाची गरज आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 1:59 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
विवाहबाह्य संबंध की नात्यात दुरावा? पुण्यात वाढलं घटस्फोटाचं प्रमाण, धक्कादायक कारणं समोर, Video









