लोकलने बाहेर पडणार असाल तर थांबा!
पश्चिम रेल्वेच्या बँड्रा रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल 13 तासांचा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत पूल क्रमांक 5 च्या री-गर्डरिंगचे काम करण्यात येणार असून यामुळे 145 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
advertisement
ब्लॉक दरम्यान मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान अप धिम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. तसेच चर्चगेट ते माहीम दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूकही जलद मार्गावर वळवण्यात येईल. या कामाअंतर्गत प्रभादेवी पुल पाडण्याचे काम सुरू होणार असून पुढील काही दिवसांत आणखी एक ब्लॉक घेऊन गर्डर काढण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे.
अजून एक ब्लॉक
याशिवाय प्रभादेवी स्थानकातील पूल पाडण्यासाठी धिम्या मार्गावर रात्री 11:30 ते सकाळी 7 वाजेपर्यंत आणखी साडेसात तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवासी त्यांच्या वैध तिकिटावर वांद्रे किंवा दादर स्थानकातून माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परेल आणि महालक्ष्मी स्थानकांपर्यंत विरुद्ध दिशेने प्रवास करू शकणार आहेत.
दरम्यान मध्य रेल्वेवरही रविवारी खोळंबा होणार आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3:45 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार असून या काळात विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी,नेरुळ दरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या कालावधीत ब्लॉक असल्याने अप आणि डाऊन सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे रविवारी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
