'मुलांना न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा मी..', मनोज जरांगे यांनी पुण्यात MPSC आंदोलनात दिला इशारा
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा प्रश्नावर पुण्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले गेले असून, या आंदोलनात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सहभाग घेतला.
पुणे : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा प्रश्नावर पुण्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले गेले असून, या आंदोलनात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सहभाग घेतला. वयोमर्यादेला फटका बसतो, यात आमची काय चूक? परीक्षेला अवघे तीन दिवस उरले आहेत, तरीही सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. आम्ही अभ्यास करायचा की आंदोलन? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 मध्ये अपेक्षित होती. मात्र, ही जाहिरात तब्बल सात महिने उशिरा प्रसिद्ध झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. वयोमर्यादा गणनेसाठी 1 नोव्हेंबर 2025 ही तारीख निश्चित केल्यामुळे केवळ काही दिवसांच्या फरकाने अनेक उमेदवार परीक्षेस अपात्र ठरले आहेत.
advertisement
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. आंदोलनस्थळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. सरकारची चूक आहे कारण जाहिरात उशिरा काढली. ही पोरं जशी तुमची आहेत, तशीच आमचीही आहेत. सर्व जाती-धर्मातील विद्यार्थी येथे आहेत त्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही.
advertisement
ते पुढे म्हणाले, हा प्रश्न दुर्लक्षित राहिला तर हे आंदोलन लोकनिवडणुकीपर्यंत जाऊ शकते. मंत्रिमहोदयांशी मी चर्चा केली असून, परीक्षा पुढे ढकलून किमान एक वर्षाची वयोसवलत द्यावी, अशी आमची मागणी आहे. गोरगरिबांच्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे. विद्यार्थ्यांनी चुकीची पावले उचलू नयेत म्हणूनच आपण येथे आलो असल्याचे सांगत, आम्हाला संघर्ष नको, न्याय हवा, अशी अपेक्षा जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. तसेच जोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. मी एकदा आंदोलनाला बसलो की प्रश्न सुटतोच,असा ठाम निर्धार देखील मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. सरकार आता या आंदोलनावर कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 10:35 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'मुलांना न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा मी..', मनोज जरांगे यांनी पुण्यात MPSC आंदोलनात दिला इशारा









