MPSC चे विद्यार्थी पुण्यात का करताय आंदोलन, नेमकी मागणी काय? Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) होणाऱ्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 च्या जाहिरातीला झालेल्या विलंबामुळे वयोमर्यादेचा फटका बसलेल्या हजारो स्पर्धा परीक्षा अभ्यासक विद्यार्थ्यांनी पुण्यात रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) होणाऱ्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 च्या जाहिरातीला झालेल्या विलंबामुळे वयोमर्यादेचा फटका बसलेल्या हजारो स्पर्धा परीक्षा अभ्यासक विद्यार्थ्यांनी पुण्यात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. जाहिरात सात महिने उशिरा आली, त्यात आमची चूक काय? अभ्यास करायचा की आंदोलन? असा थेट सवाल विद्यार्थ्यांनी शासनाला केला आहे.
एमपीएससीकडून ही जाहिरात जुलै 2025 मध्ये अपेक्षित होती. मात्र ती तब्बल सात महिने उशिरा प्रसिद्ध झाल्याने अनेक उमेदवार वयोमर्यादेतून बाहेर फेकले गेले. वयोमर्यादा गणनेसाठी 1 नोव्हेंबर 2025 ही तारीख निश्चित करण्यात आल्याने अवघ्या काही दिवसांच्या फरकाने हजारो विद्यार्थी परीक्षेस अपात्र ठरले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
परीक्षेला अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही सरकारतर्फे कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता. 1) पुण्यातील शास्त्री रस्त्यावर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नदीपात्र परिसरात एकत्र येत पुन्हा आंदोलन तीव्र केले.
advertisement
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, जानेवारीत येणारी जाहिरात अनेकदा डिसेंबरमध्ये येते. यावर्षी मात्र ती अपेक्षेपेक्षा फार उशिरा आल्याने तयारी करूनही हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. दोन वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. पहिल्यांदा पूरस्थितीमुळे, तर नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर रोजी निवडणूक निकाल असल्याने परीक्षा पुढे ढकलली गेली. त्या वेळी आमची कोणतीही मागणी नव्हती. मात्र आता जाहिरात उशिरा काढल्याने झालेल्या अन्यायाकडे सरकार डोळेझाक करत आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
advertisement
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी निवेदने, पत्रव्यवहार करून तसेच सुमारे 70 ते 80 आमदारांची भेट घेऊन आपली मागणी मांडली. तरीही शासनाने ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. संविधान हे लोकांसाठी आहे. जनतेचे न्यायालय हेच खरे न्यायालय आहे, अशी भावना आंदोलनस्थळी व्यक्त करण्यात आली.
advertisement
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत वयोमर्यादेत सवलत देण्याची, तसेच उशिरा निघालेल्या जाहिरातीचा परिणाम भरून काढण्यासाठी तातडीचा निर्णय घेण्याची प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आता या आंदोलनावर शासन काय भूमिका घेते, याकडे राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 9:40 PM IST









