बीकेसी-वाकोला उन्नत मार्गाच्या कामांना गती
सुमारे 1.2 किमी लांबीचा हा उन्नत मार्ग सध्या 80 टक्के पूर्ण झाला असून उरलेल्या टप्प्यांवर जलदगतीने काम सुरू आहे. यापूर्वी केबल-स्टेड पुलाच्या बांधकामामुळे उड्डाणपुलाच्या काही भागांवर काम मंदावले होते. मात्र आता तो अडथळा दूर झाल्याने संपूर्ण प्रकल्प अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. विद्यापीठ चौक परिसरातील पूर्वीचे एससीएलआरचे कामही पूर्णत्वास गेले असून दोन्ही प्रकल्पांच्या जोडणीमुळे वाहतुकीची दिशा सुकर होणार आहे.
advertisement
कोणाला होणार जास्त फायदा?
या नव्या मार्गामुळे वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, युनिव्हर्सिटी जंक्शन आणि बीकेसी जंक्शन अशा महत्वाच्या ठिकाणांकडे जाण्यासाठी वाहनधारकांना एक पर्यायी आणि अधिक सोयीस्कर रस्ता मिळणार आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी हा मार्ग मोठा दिलासा ठरणार असून दैनंदिन वाहतूक कोंडी लक्षणीय घटण्याची शक्यता आहे.
दहिसर दिशेने येणाऱ्या वाहनांसाठीही हा उन्नत मार्ग मोठी सुविधा ठरेल. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विद्यमान उड्डाणपुलावरून थेट या मार्गावर चढण्याची सोय उपलब्ध होणार असून संपूर्ण प्रवास सिग्नल-विरहित असेल. परिणामी सांताक्रुझ ते बीकेसी हे अंतर अवघ्या 5 ते 10 मिनिटांत पार करता येणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये कोणती?
अंदाजित खर्च: 645 कोटी रुपये
एकूण लांबी: 1.2 किमी
दोन्ही दिशांना दोन लेनची सोय
थेट संपर्क: वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, युनिव्हर्सिटी जंक्शन, बीकेसी जंक्शन
बीकेसीकडे वाढणारी वाहतूक आणि सतत वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता हा उन्नत मार्ग मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
