चव्हाण यांच्या मते, विरोधक मराठीचा वापर फक्त राजकारणासाठी आणि दुसऱ्यांना दोष देण्यासाठी करत आहेत. याउलट, भाजपची भूमिका ही मराठी भाषा, संस्कृती आणि जागतिक स्तरावरील मराठी माणूस अशा अनेकवचनी स्वरूपाची आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या 'विश्वात्मके देवे' या तत्त्वाचा आधार घेत चव्हाणांनी विरोधकांना सुनावले की, त्यांची मराठी बाबतची भूमिका ही द्वेषाने भरलेली आहे.
advertisement
भाजप हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या तिघांच्याही मराठी विचारांनी प्रेरित असलेला पक्ष आहे, असा दावा त्यांनी केला. गुढीपाडवा शोभायात्रा ही भाजप कार्यकर्त्यांची संकल्पना असल्याचे सांगून त्यांनी मराठी संस्कृतीवरील स्वतःचा हक्क अधोरेखित केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याचे श्रेय घेत त्यांनी विरोधकांचा 'नकारात्मकतेचा' आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
रविंद्र चव्हाण यांनी या विधानातून थेट उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्या 'मराठी कार्ड'ला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. "आम्ही फक्त मुंबईपुरते मर्यादित नाही, तर जगभरातील मराठी माणसाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत," असे म्हणत त्यांनी आपली व्याप्ती वाढवली आहे.
महाराष्ट्रातच नव्हे तर जगात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या उन्नतीसाठी भाजपा कटिबद्ध असून राज्याची प्रगती, राज्यातील नागरिकांचं जीवन अधिक सुसह्य व्हावं, देशभक्त आणि संस्कारित पिढी तयार व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया. भाजपाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि जगभर साजरा होणारी गुढी पाडवा शोभायात्रा भाजपा कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून प्रथम सुरु झाली हेच आमचे मराठी भाषेबाबतचे अनेकवचन असल्याचा पुनरुच्चार भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला.
