मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्यानंतर आता आरक्षण सोडतीकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे. आरक्षण सोडत कधी निघणार याकडे अनेक माजी नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर आज राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. या संदर्भात आरक्षण सोडतीचा शासकीय अध्यादेश काढण्यात आला आहे.
advertisement
कसा असणार आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपूर्ण वेळापत्रक
- आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरता प्रस्ताव सादर करणे- ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर
- आरक्षण सोडीतीची जाहीर सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे- ६ नोव्हेंबर
- आरक्षणाची सोडत काढणे, सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे - ११ नोव्हेंबर
- प्रारुप आरक्षण, हरकती आणि सूचना मागवण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिद्ध करणे - १४ नोव्हेंबर
- प्रारुप आरक्षण हरकती आणि सूचना मागविण्याचा अंतिम दिनांक - २० नोव्हेंबर
- प्रारुप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर विचार करून मुंबई महानगरपालिका यांनी आदेशात नमुन्यात निर्णय घेणे - २१ ते २७ नोव्हेंबर
- अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे - २८ नोव्हेंबर
आरक्षण सोडतीकडे अनेकांचे लक्ष
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला होता. त्यानतर मुंबई महापालिकेवर प्रशासकच आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. २२७ प्रभाग रचना अंतिम होऊन त्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षण सोडतीकडे अनेकांचे लक्ष आहे. 227 प्रभागांपैकी 17 प्रभाग हे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी सुरुवातीपासूनच राखीव आहेत. त्यामुळे उर्वरित 210 प्रभागांतून ओबीसी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. मुंबईतील राजकीय समीकरणांना यामुळे वेग येणार आहे.
