मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (NH-48) पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबे पाडा परिसरात रविवारी एका तरुणाला संशयास्पद गोणी आढळून आली. महामार्गापासून साधारण एक किमी अंतरावरील निर्जन पायवाटेवर ही गोणी पडलेली होती. तरुणाने तत्परतेने पोलिसांना माहिती दिली मात्र गोणी उघडताच समोर आलेले दृश्य पाहून पोलीसही चक्रावून गेले. गोणीत एका पुरुषाचे धड होते, मात्र त्याचे 'शिर' गायब होते.
advertisement
रागातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज
पोलिसांनी पंचनामा केला असता, मृतदेहाच्या हातावर अशोक सिंह असे नाव गोंदलेले (टॅटू) आढळून आले आहे. मृतदेहाची अवस्था पाहता, ही हत्या अत्यंत रागातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मारेकऱ्यांनी मृतदेहाची ओळख पटू नये आणि गुन्ह्याचा सुगावा लागू नये, यासाठी शिर कापून ते दुसरीकडे विल्हेवाट लावली असावी, असा संशय बळकावला आहे.
पुरावे गोळा करण्याचे काम सुरू
घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, पोलीस निरीक्षक कांबळे आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून परिसरातून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. 'अशोक सिंह' नावाच्या बेपत्ता व्यक्तींची माहिती आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांतून घेतली जात आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
निर्जन ठिकाणी मृतदेहाचे तुकडे करून फेकण्याच्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महामार्गालगतचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पेलत आहेत. हा ऑनर किलिंगचा प्रकार आहे की व्यावसायिक वादातून झालेली हत्या या दिशेनेही तपास सुरू आहे.
