मध्य रेल्वेच्या मुंब्रा-दिवा रेल्वे मार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता.या दुर्घटनेनंतर तयार करण्यात आलेल्या चौकशी अहवालातील सूचनांची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकल डब्यांमधील पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या पन्हाळीच्या रचनेत महत्त्वपूर्ण बदल केले जाणार आहेत.
लोकल प्रवाशांच्या अपघाताचे कारण काय?
advertisement
9 जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर अनेक प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय समितीची स्थापना करून सखोल चौकशी केली. या अहवालात लोकल गाड्यांचे दरवाजे कायम उघडे असतात आणि गर्दीमुळे अनेक प्रवासी फुटबोर्डवर उभे राहून किंवा दरवाजाजवळील पन्हाळीला धरून प्रवास करतात यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते.
लोकल ट्रेनच्या दरवाजात करण्यात आला बदल
या सर्व गोष्टींचा विचार करता समितीने तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या. त्यानुसार सध्या कुर्ला कारशेडमध्ये काही लोकल डब्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. दरवाजालगत असलेली पन्हाळी आता नव्या डिझाइनमध्ये तयार करण्यात येत असून तिचा आकार धनुष्यबाणासारखा उंचावण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना ती पकडून लटकणे शक्य होणार नाही.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते हे बदल यशस्वी ठरल्यास भविष्यात सर्व लोकल डब्यांमध्ये ही सुधारणा करण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
