मुंबईतील कोस्टल रोडच्या उत्तरेकडील लेनवर असलेल्या म्युझिक बीट्सने, तयार केलेल्या पॅचवरून वाहने जाताना 'जय हो' हे गाणे वाजत असल्यामुळे लक्ष वेधून घेतले होते. पण त्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना फार त्रास होत होता. ब्रीच कँडीच्या परिसरातील रहिवाश्यांनी रस्त्यावरून, विशेषतः पहाटे आणि रात्री उशिरा येणाऱ्या सततच्या आवाजावर आक्षेप घेतला. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पूर्वी या रोडवरील साऊंड डेसिबलची मोजणी करण्यात आली होती. पण तरीही त्याचा आता नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे रस्त्याचा हा भाग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक रहिवाशांनी केलेल्या विरोधामुळे आम्ही तेवढ्या भागावर बॅरिकेट्स लावले आहेत. तो भाग केवळ विशेष प्रसंगी किंवा शनिवार- रविवारीच उघडला जाऊ शकतो.”
advertisement
11 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड (दक्षिण) मधील अमरसन्स गार्डन ते ब्रिच कँडी या संगीत रस्त्याचे (मेलोडी रोड) उद्घाटन करण्यात आले. या रोडसाठी राज्य सरकारने 6 कोटी रुपये खर्चले होते. बोगद्यापासून सुमारे 500 मीटर पुढे असलेल्या या रस्त्यावर, वाहने ताशी 70- 80 किमी वेगाने धावतात. त्या पॅचवरून भरधाव वेगाने गाड्या गेल्यानंतर 'जय हो' गाण्याचा आवाज येतो. 'मेलडी रोड'ची संकल्पना जरीही नवीन असली तरीही परिसरातील 650 हून अधिक कुटुंबांनी पालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्याकडे रस्ता बंद करण्याची मागणी केलेली होती. रस्त्याचा आवाज हा एक सततचा आणि त्रासदायक असल्यामुळे आम्हाला याचा फार त्रास होतो, असं त्यांनी आयुक्तांना सांगितलेलं. रहिवाशांनी तक्रार देताना त्यांच्या समस्याही मांडल्या होत्या.
“मेलडी रोडमुळे परिसरातील नागरिकांना फारच त्रास होत आहे. या आवाजामुळे आम्ही आमच्या खिडक्या उघड्या ठेवू शकत नाही. तो आवाज सतत ऐकू येत असल्यामुळे त्याचा आम्हाला फार त्रास होतोय.”, असे रहिवाशांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले. जपान, हंगेरी आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये मेलडी रोडचा कायमच वापर केला जातो.
