तब्बल सहा वर्षे बंद राहिल्यानंतर मंगळवारी हे सिनेमागृह पुन्हा सुरू करण्यात आले. कोणताही मोठा गाजावाजा न करता सायंकाळी 5:30 वाजता हिंदी चित्रपटाचा पहिला शो प्रदर्शित करण्यात आला. साध्या पद्धतीने झालेल्या या पुनरारंभामुळे परिसरात मात्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
भारत माता सिनेमागृहाची ओळख ही मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठीच राहिली आहे. विशेषतः दादा कोंडके यांच्या चित्रपटांनी येथे प्रचंड गर्दी खेचली होती. त्यामुळे मराठी चित्रपटांचे प्रीमियर शो आणि प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती यासाठी हे थिएटर प्रसिद्ध होते. लवकरच येथे पुन्हा मराठी चित्रपट दाखवले जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. 2020 मध्ये काही काळासाठी सिनेमागृह बंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आलेल्या COVID-19 महामारीमुळे परिस्थिती बदलली आणि हे थिएटर दीर्घकाळासाठी बंदच राहिले. लॉकडाऊन आणि आर्थिक अडचणींमुळे पुन्हा सुरू होण्यास विलंब झाला.
advertisement
दरम्यान, नूतनीकरणानंतर सिनेमागृहाला आधुनिक स्वरूप देण्यात आले आहे. मोठा पडदा, नवीन प्रोजेक्टर रूम, तसेच बाल्कनीमध्ये सुमारे 40 आरामदायी सोफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जुन्या भारतमाताचा लूक कायम ठेवत नव्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या हे सिनेमागृह One Cinemas यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू करण्यात आले असून, प्रवेशद्वारावर वन सिनेमाज या नावासोबतच भारत माता हा मूळ फलकही कायम ठेवण्यात आला आहे.
सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या भारत माता सिनेमागृहामुळे मराठी चित्रपटप्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला असून, येत्या काळात हे थिएटर पुन्हा एकदा आपल्या जुन्या वैभवात झळकणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





