या तांत्रिक बिघाडाचा थेट परिणाम एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनवर झाला आहे. परिणामी, मुंबईतील अनेक सीएनजी पंपावर आता गॅसचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले आहे की, कंपनी आपल्या घरगुती पीएनजी (PNG) ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय गॅसचा पुरवठा सुरू ठेवण्यास प्राधान्य देणार आहे. याचा अर्थ, घरातील स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस ग्राहकांना सध्या तरी काळजी करण्याची गरज नाही.
advertisement
गॅस पुरवठ्यात आलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील अनेक सीएनजी स्टेशन्स बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः, सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी, ऑटो, बेस्ट बसेस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर या स्थितीचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे. जोपर्यंत सीएनजीचा पुरवठा पूर्ववत आणि स्थिर होत नाही, तोपर्यंत या सेवांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे.
वडाळा येथील सिटी गेट स्टेशनला गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे, महानगर गॅस लिमिटेडने बाधित क्षेत्रातील औद्योगिक आणि व्यावसायिक गॅस ग्राहकांना पर्यायी इंधनाचा वापर करण्याची सूचना केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता, केवळ सीएनजी पंपांवरच नव्हे, तर राज्य परिवहन उपक्रमांच्या सीएनजी पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
हा बिघाड लवकरच दूर करण्याचा प्रयत्न गेल आणि एमजीएलकडून युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक आणि उद्योगांवर कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, सीएनजी पुरवठा स्थिर होईपर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना थोडा त्रास सहन करावा लागू शकतो.
