शनिवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांनी मुंबई महापालिकेसाठी स्वबळाची घोषणा केली. महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत वाटाघाटीची बोलणी नको अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी बैठकीमध्ये व्यक्त केल्याची माहिती मिळतेय . विशेषता: बिहारमधील काँग्रेसच्या पराभवानंतर अंबादास दानवे यांनी काँग्रेसच्या जागावाटपातील भुमिकेमुळं महाराष्ट्रातही मविआचं नुकसान होतं असं अधोरेखित केल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
काँग्रेस एकला चलो रेच्या भूमिकेत का?
गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे बंधूंच्या या युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस एकला चलो रेच्या भूमिकेत राहणार असल्याचं संकेत मिळत आहेत. मात्र याच मुद्यावरून काँग्रेस आणि मनसेच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलंय. मुंबई महापालिकेत काँग्रेसनं स्बबळांच्या मार्गानं जाण्याचं ठरवलं असल्यानं लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढलेल्या मविआला तडे गेलेत.
मुस्लिम मतदारांची ठाकरेंच्या पक्षाला साथ
परप्रांतियांच्या मुद्यावरून मनसेनं सुरूवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होऊन ते मविआचा भाग झाल्यास ही बाब मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांचा पाठिंबा असलेल्या काँग्रेससाठी अडचणीची ठरू शकते.त्याचसोबत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद असताना कोरोना काळात केलेल्या कामामुळं मुस्लिम मतदारांनी ठाकरेंच्या पक्षाला साथ दिली.
महायुतीला त्याचा फायदा होण्याची शक्यता
विशेषत: मुस्लिम व्होट बँक ही काँग्रेसची व्होट बँक समजली जाते. मात्र उद्धव ठाकरेंमुळं ही मतं ठाकरेंच्या पक्षाकडे वळतात आणि त्याचा फटका पक्षाला बसतो असं काँग्रेसच्या नेत्यांचं मत आहे. त्यामुळं काँग्रेसनं पालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे . मात्र काँग्रेसची ताकद कमी झालेली असताना मध्यममार्ग काढण्याऐवजी काँग्रेसनं एकला चलो रेची भूमिका घेतल्यानं त्याचा फटका मविआला बसणार असून महायुतीला त्याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे ही वाचा :
