केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या देशभरात 93 सक्रिय रुग्ण आहेत. हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर मुंबईच्या रुग्णालयातही कोविड-19 चे रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण वाढले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यापर्यंत आठवडाभरात सरासरी एक रुग्ण आढळून येत होता. मात्र, मे महिन्यात एका आठवड्यात 3-5 रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, ही प्रकरणे गंभीर नसून एका सामान्य तापासारखी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
advertisement
काळजी घेण्याचे आवाहन...
हवामान बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत असून लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः वृद्ध आणि ज्यांना आधीच इतर आजार आहेत अशांनी आपली अधिक काळजी घ्यावी. मास्क घालण्याचा, स्वच्छता राखण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोनामुळे दोघांचा मृत्यू?
केईएम रुग्णालयात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. दोन्ही रुग्णांची कोविड चाचणी प़ॉझिटिव्ह आली. मात्र, हे दोन्ही रुग्ण गंभीर आजाराने त्रस्त असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली. एका रुग्णाचा मृत्यू कर्करोगामुळे झाला आणि दुसऱ्याचा किडनीच्या गंभीर आजाराने झाला असल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली.
मृतदेह देण्यास नकार...
परळ येथील 59 वर्षीय कॅन्सरग्रस्त महिलेचा शनिवारी केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेचा मृतदेह देण्यास रुग्णालयाने नकार दिला. कुटुंबाने माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याशी संपर्क साधला. अनिल कोकीळ म्हणाले की, महिलेला कर्करोग होता, परंतु तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. अशा परिस्थितीत, रुग्णालयाने प्रोटोकॉलनुसार मृतदेह कुटुंबाला दिला नाही. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी बोलल्यानंतर, मृतावर प्रोटोकॉलनुसार कुटुंबातील फक्त दोन सदस्यांसह भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.