दादर स्टेशनचा होणार कायापालट
सध्या दादर पश्चिम रेल्वे स्थानकावर मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी केवळ प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 7 उपलब्ध आहेत. मात्र वाढणाऱ्या गाड्यांच्या संख्येमुळे आणि ऑपरेशनल ताण कमी करण्यासाठी नव्या मार्गिकेसह प्लॅटफॉर्म क्रमांक 8 उभारण्यात येत आहे. हा प्लॅटफॉर्म सुमारे 600 मीटर लांबीचा असणार असून त्यासाठी अंदाजे 70 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
advertisement
ही योजना एमयूटीपी अर्थात मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत सुरू असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाचा भाग आहे. सध्या सहावी मार्गिका माहीमपर्यंत पूर्ण झाली असून पुढील टप्प्यात ती मुंबई सेंट्रलपर्यंत नेण्यात येणार आहे. या प्रक्रियेत दादरवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 भविष्यात बंद करावा लागू शकतो त्यामुळे नवीन प्लॅटफॉर्म अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
नव्या मार्गिकेमुळे दादर स्थानकाची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. ओव्हरहेड वायरिंग, अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा, क्रॉसओव्हर पॉइंट्स अशा अनेक तांत्रिक सुधारणा करण्यात येणार आहेत. परिणामी दादर स्थानकाला मिनी-टर्मिनलसारखी सुविधा मिळेल आणि अधिक गाड्या येथून सुरू करणे शक्य होणार आहे.
बांधकाम सुरू असताना दादर स्थानकात होणार 'हे' मोठे बदल
बांधकामाच्या काळात काही बदलही करण्यात येणार आहेत. दादर रेल्वे कॉलनीची भिंत, दक्षिणेकडील पादचारी पुलाचा काही भाग तसेच तिकीट केंद्राचा जिना पाडून तो नव्याने उभारण्यात येईल. यार्ड मास्टरचे कार्यालय पूर्वेकडे हलवले जाणार असून ओव्हरहेड वायर, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन व्यवस्थेतही आवश्यक बदल केले जातील. तसेच मध्य रेल्वेच्या मार्गिकाही येथे असल्याने भविष्यात प्लॅटफॉर्म क्रमांकांमध्ये बदल होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
