नेमकं घडलं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तीन तक्रारदार पुढे आले असून त्यांची सुमारे 18 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. पण तपासात देशभरातील तब्बल 104 जणांना गंडा घालून 10 कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
असा झाला प्रकार उघड
ही कन्सल्टन्सी नीट परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं आमिष दाखवत होती. कौन्सलिंगच्या नावाखाली मोठ्या रकमा उकळल्या जात होत्या. पैसे घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना बनावट अलॉटमेंट लेटर देण्यात येत होतं. मात्र, विद्यार्थी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये दाखल होण्यासाठी गेल्यानंतर हा सगळा प्रकार बनावट असल्याचं उघड होत होतं.
advertisement
या प्रकरणातील मुख्य आरोपीला हैद्राबादमध्ये अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घोटाळ्यात आणखी बळी पडलेले विद्यार्थी पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी तक्रारदार देबशिश यादव आणि सौरभ सहानी यांनी आपली आपबीती सांगत मोठ्या विश्वासघाताची भावना व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू असून आर्थिक गुन्हे शाखेची मदतही घेतली जाण्याची शक्यता आहे.
डिसेंबरमधील परदेशी शिक्षण स्कॅमची पुनरावृत्ती?
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीही मुंबईत अशाच प्रकारचा शिक्षण घोटाळा समोर आला होता. चारकोप परिसरातील “Career and Options Service Limited” या एजन्सीने परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली होती.
या प्रकरणात सुरुवातीला 13 तक्रारदार होते, मात्र नंतर ही संख्या 19 वर पोहोचली. एकूण फसवणुकीची रक्कम तब्बल 2 कोटी 87 लाख 54 हजार 253 रुपये इतकी असल्याचं उघड झालं. आरोपी स्टेला मेहता आणि राकेश मेहता यांनी अनेक विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले होते. फक्त मुंबईच नाही, तर नाशिकमधील विद्यार्थ्यालाही या फसवणुकीचा फटका बसल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांनी ओरिसाकडे पळ काढल्याची माहिती आहे.
शिक्षण क्षेत्रातील फसवणुकीचे वाढते प्रकार
मेडिकल आणि परदेशी शिक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असून पालकांची आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे अशा कन्सल्टन्सी आणि एजन्सींबाबत सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
