मुंबई: मुंबईतून शिक्षकीपेक्षाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी भागातील एका मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापकावर महिलाा सहशिक्षिकेनं विनयभंग आणि मारहाणीचा आरोप केला आहे. या मुख्याध्यापकाने गैरवर्तन केल्याचा आरोप, या महिलेनं केला असून या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील डी.एन. नगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यम शाळेतील मुख्याध्यापकावर महिला सहशिक्षिकेचा विनयभंग आणि मारहाणीचा आरोप केला आहे. डी.एन. नगर पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या महापालिकेच्या शाळेत ही घटना घडली.
advertisement
पीडित महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्याविरोधात डी.एन. नगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित शिक्षिकेनं डी.एन.नगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्याध्यापकाने महिलेला केबिनमध्ये एकटीला बोलावून मोबाईलवर रेकॉर्डिंग करून वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
आरोपी मुख्याध्यपकाने वर्गात अध्यापन करत असताना वारंवार केबिनमध्ये बोलावणे, चहा-फळ देण्याच्या बहाण्याने बोलणे आणि वाईट नजरेनं पाहत होता, असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. 19 जानेवारीला मुख्याध्यापकाने महिलेच्या डोक्यावर टपली मारत केसाला स्पर्श केला होता, पण महिलेने विरोध केला. त्यानंतर रागाच्या भरात मुख्याध्यापकाने खुर्ची फेकून हल्ला केला, या घटनेत महिलेच्या पायाला दुखापत झाली, असा आरोपही या शिक्षिकेनं केला आहे. या शिक्षिकेच्याा तक्रारीवरून मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी डी.एन. नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
