अमित प्रजापती असं अटक केलेल्या २१ वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. त्याचे विरारमधील पीडित तरुणीसोबत प्रेमसंबंधत होते. पण अलीकडेच तिने आरोपीसोबत ब्रेकअप केला होता. यानंतर आरोपीनं तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याने जिला जीव लावला तिचेच अमानुष हाल केले. आरोपीचा त्रास सहन न झाल्याने पीडितेनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. पीडितेनं आरोपीसोबत ब्रेकअप केल्यानंतर अमित तिला त्रास देऊ लागला. आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. याबाबत जाब विचारण्यासाठी मुलीचे वडील सोमवारी सकाळी महाविद्यालयात गेले असता, त्याने साथीदारांच्या मदतीने त्यांनाच मारहाण केली. हा प्रकार सहन न झाल्याने या मुलीने सोमवारी आत्महत्या केली. संबंधित तरुण माझ्या मुलीला ब्लॅकमेल करून पैसे मागत होता. तिने १५ हजार रुपये त्याला दिले होते, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला.
चार तरुणांविरोधात गुन्हा
मृत तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चार तरुणांनी छळ केल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी शिवा, अमित प्रजापती, नितीन यांच्यासह अन्य एक अशा एकूण चार तरुणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अमितचा मोबाइल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.