सध्या 'या' ठिकाणी सुरु आहे काम
बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वेकडील एक्सप्रेस हायवेवरील अण्णाभाऊ साठे पुलाखाली एक्सेस कंट्रोलचे काम सुरू झाले आहे. तर पश्चिमेकडील एक्सप्रेस हायवेवर तीन ठिकाणी हे काम लवकरच सुरू होणार आहे. या ठिकाणांमध्ये बोरीवलीतील सुधीर फडके रोड, विलेपार्ले येथील हनुमान रोड आणि सांताक्रूझमधील मिलन सब-वे परिसराचा समावेश आहे.
advertisement
पश्चिम एक्सप्रेस हायवेवर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा होत असल्याने वाहतुकीला अडथळा न येऊ देता काम करण्यासाठी बॉक्स पुशिंग या अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला जाणार आहे.
बॉक्स पुशिंग म्हणजे काय?
'बॉक्स पुशिंग' ही अशी बांधकाम तंत्रज्ञान पद्धत आहे. ज्यात वाहतूक बंद न करता रस्त्याखाली अंडरपास तयार केला जातो. या पद्धतीत आधीच तयार केलेले आरसीसी बॉक्स मोठ्या जॅकच्या सहाय्याने जमिनीत पुढे ढकलले जातात. बॉक्स पुढे सरकताना त्यातील माती बाहेर काढली जाते आणि त्यामुळे वरचा रस्ता खुला राहतो.
एक्सेस कंट्रोलचा उद्देश
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना गाड्यांच्यामधून रस्ता ओलांडावा लागू नये आणि अपघातांची शक्यता कमी व्हावी हा आहे. नागरिकांना सुरक्षित आणि सुलभरीत्या हायवे ओलांडता यावा यासाठी या अंडरपासचा उपयोग होईल.
पूर्वेकडील एक्सप्रेस हायवे सुमारे 23.55 किलोमीटर लांब असून पश्चिमेकडील एक्सप्रेस हायवे सुमारे 24 किलोमीटर आहे. हा मार्ग माहिमपासून सुरू होऊन बांद्रा, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली, दहिसरमार्गे मीरा-भाईंदर आणि पुढे वसई-विरार आणि गुजरातकडे जातो.
बीएमसीने आगामी काळात एकूण आठ ते नऊ अशा एक्सेस कंट्रोल अंडरपास उभारण्याची योजना आखली असून त्यामुळे मुंबईतील रस्ते अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होतील.
