मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ओएनजीसीच्या उरण येथील गॅस प्रक्रिया केंद्रात तांत्रिक अडचणीमुळे बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडच्या (MGL) वडाळा येथील सिटी गेट स्टेशनला (CGS) होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
महानगर गॅस लिमिटेड आपल्या घरगुती पीएनजी (PNG) ग्राहकांना प्राधान्याने विनाखंड पुरवठा करत असतो. पण, जर महानगर गॅस लिमिटेडच्या सिटी गेट स्टेशनमधील दाब आणखी कमी झाला, तर मुंबईतील अनेक सीएनजी (CNG) स्टेशनमधील पुरवठा कमी दाबाअभावी थांबू शकतो, असं महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
या बिघाडामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा सल्ला महानगर गॅस लिमिटेडकडून देण्यात आला आहे. दरम्यान, ओएनजीसीकडून नैसर्गिक वायूचा पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर महानगर गॅसच्या संपूर्ण नेटवर्कमधील पुरवठा सामान्य होईल, अशी ग्वाहीही महानगर गॅस लिमिटेडकडून देण्यात आली आहे.
मात्र, ओएनजीसीच्या उरण येथील गॅस प्रक्रिया केंद्रात बिघाड झाल्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल महानगर गॅस लिमिटेडने दिलगिरी व्यक्त केली आहे.