'या' स्थानकावर मिळणार थांबा
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दोन महत्त्वाच्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर नवीन थांबे देण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्यांदा तरहुबळी–पुणे वंदे भारत एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 20669/20670) या गाडीला आता किर्लोस्करवाडी येथे थांबा मिळणार आहे. याशिवाय सीएसएमटी–सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 22225/22226) या गाडीला आता दौंड येथे थांबा देण्यात येणार आहे.
advertisement
रेल्वे प्रशासनाने सांगितले की हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला आहे. म्हणजेच काही काळासाठी या थांब्यांची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद आणि प्रवासातील सोय पाहून या थांब्यांना कायमस्वरूपी मान्यता देण्याचा निर्णय घेतला जाईल.
रेल्वे बोर्डाने संबंधित झोनला तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून लवकरच या दोन्ही वंदे भारत गाड्या त्यांच्या नवीन थांब्यांवर थांबताना दिसतील. हा बदल विशेषतहा दौंड आणि किर्लोस्करवाडी परिसरातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
या दोन्ही स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता सोलापूर, पुणे आणि मुंबईकडे जाण्यासाठी अधिक सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहेत. दौंड हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन असून अनेक प्रवासी दररोज मुंबई किंवा पुण्याकडे प्रवास करतात. त्यामुळे या थांब्यामुळे स्थानिक प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने हेही स्पष्ट केले की, या नव्या थांब्यांमुळे गाडीच्या एकूण प्रवासाच्या वेळेत फारसा फरक पडणार नाही. तसेच, प्रवाशांच्या मागणीवरूनच हा निर्णय घेतल्याचेही सांगण्यात आले आहे. सोलापूर आणि दौंड परिसरातील रेल्वे प्रवासी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून वंदे भारत गाडीचा थांबा दौंड येथे मिळाल्याने स्थानिकांना मोठी सुविधा होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
