मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पूर्व परिसरात 19 जानेवारी रोजी संध्याकाळच्या वेळेत घडलेल्या एका धक्कादायक घरफोडीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य दरवाजे फोडून आत प्रवेश केला आणि लाखोंचा सोन्या–चांदीचा ऐवज घेऊन पसार झाले.
तक्रारदार हनुमान रोड परिसरात चहा पिण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान सायंकाळी सुमारे 7.22 वाजता त्यांच्या पत्नीचा फोन आला आणि घरात चोरी झाल्याची माहिती त्यांनी दिली. माहिती मिळताच तक्रारदार तात्काळ घरी परतले. घरी आल्यानंतर पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, त्या थोड्या वेळासाठी दूध आणण्यासाठी हनुमान रोड येथे गेल्या होत्या. बाहेर जाताना त्यांनी घराचे लाकडी सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजा दोन्ही कुलूप लावून बंद केले होते. मात्र दूध घेऊन परत आल्यानंतर दोन्ही दरवाज्यांची कुलुपे तोडलेली आढळून आली, त्यामुळे त्यांना चोरी झाल्याचा अंदाज आला.
advertisement
घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी थेट बेडरूममधील लोखंडी कपाटाकडे मोर्चा वळवला. कपाटातील लॉकरचे कुलूप तोडून आत ठेवलेले सोन्याचे हार, मंगळसूत्र, बांगड्या, तोडे, अंगठ्या तसेच मोठ्या प्रमाणात चांदीच्या धार्मिक आणि पूजाविधीच्या वस्तू चोरट्यांनी उचलून नेल्या. प्राथमिक तपासात चोरी गेलेल्या ऐवजाची किंमत सुमारे 41 लाख रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांनी घटनेची नोंद घेत घटनास्थळी पंचनामा केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात असून, चोरट्यांचा मार्ग आणि हालचालींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक पाहणीत ही चोरी अत्यंत अनुभवी चोरट्यांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
गर्दीचा परिसर, अल्प वेळ आणि मोठा मुद्देमाल—या घटनेमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून, लवकरच चोरट्यांचा छडा लागेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
चोरीला गेलेला एकूण ऐवज
12 तोळे वजनाचे 4 सोन्याचे हार – अंदाजे किंमत ₹8,40,000/-
5 तोळे वजनाचे 2 सोन्याचे मंगळसूत्र – अंदाजे किंमत ₹3,50,000/-
3 तोळे वजनाचे 2 सोन्याचे बाजूबंद – अंदाजे किंमत ₹2,10,000/-
7 तोळे वजनाचे 4 सोन्याचे तोडे – अंदाजे किंमत ₹4,90,000/-
4 तोळे वजनाचे 2 सोन्याच्या बांगड्या – अंदाजे किंमत ₹2,80,000/-
2 तोळे वजनाचे 1 सोन्याचे कडे – अंदाजे किंमत ₹1,40,000/-
5 तोळे वजनाचे 4 सोन्याच्या अंगठ्या – अंदाजे किंमत ₹3,50,000/-
2 ग्रॅम वजनाची 1 जोडी सोन्याची कानातली (काप) – अंदाजे किंमत ₹15,000/-
5 ग्रॅम वजनाच्या 2 जोड्या सोन्याच्या कानातल्या – अंदाजे किंमत ₹35,000/-
2 तोळे वजनाचे 1 सोन्याची पोळ्याची माळ – अंदाजे किंमत ₹1,40,000/-
1 तोळा वजनाची 1 सोन्याची लांब माळ – अंदाजे किंमत ₹70,000/-
2.5 तोळे वजनाच्या 3 सोन्याच्या चैन – अंदाजे किंमत ₹1,75,000/-
4.2 तोळे वजनाचे 2 सोन्याचे पाटल्या – अंदाजे किंमत ₹2,95,000/-
2.5 तोळे वजनाचे 1 सोन्याचे हातपण – अंदाजे किंमत ₹1,75,000/-
50 ग्रॅम वजनाचा 1 चांदीचा मेखळा – अंदाजे किंमत ₹5,000/-
1400 ग्रॅम वजनाच्या 2 चांदीच्या समई – अंदाजे किंमत ₹1,40,000/-
1 किलो वजनाचे 1 चांदीचे ताट – अंदाजे किंमत ₹1,00,000/- 400 ग्रॅम वजनाचा
1 चांदीचा थाळा – अंदाजे किंमत ₹40,000/-
200 ग्रॅम वजनाचा 1 चांदीचा (भांडे) – अंदाजे किंमत ₹20,000/-
360 ग्रॅम वजनाचे 6 चांदीचे वाटे – अंदाजे किंमत ₹36,000/-
20 ग्रॅम वजनाचे 2 चांदीचे लहान दिवे – अंदाजे किंमत ₹2,000/-
10 ग्रॅम वजनाचा 1 चांदीचा शोभेचा दिवा – अंदाजे किंमत ₹1,000/-
3 ग्रॅम वजनाचे 1 चांदीचे फूल – अंदाजे किंमत ₹300/-
20 ग्रॅम वजनाचे 2 चांदीचे कुंकवाचे करंडे – अंदाजे किंमत ₹2,000/-
100 ग्रॅम वजनाचे 3 चांदीचे बाऊल – अंदाजे किंमत ₹10,000/-
640 ग्रॅम वजनाचे 8 चांदीचे पेले – अंदाजे किंमत ₹64,000/-
150 ग्रॅम वजनाचा 1 चांदीचा लोटस बाऊल – अंदाजे किंमत ₹15,000/-
1 किलो वजनाचे 2 चांदीचे कलश – अंदाजे किंमत ₹1,00,000/-
