संधी साधताच केअरटेकरने केला मोठा घात
तक्रारदार महिला वयाने 45 वर्षांची असून त्या अंधेरीतील लोखंडवाला परिसरात आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांसोबत राहतात. त्या सल्लागार म्हणून काम करत असल्याने घरातील कामासाठी त्यांनी दोन मोलकरणी ठेवलेल्या होत्या. तसेच आईची काळजी घेण्यासाठी रंजना नावाच्या एका महिलेला केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते.
रंजना ही महिला 28 डिसेंबर 2025 रोजी कामावर रुजू झाली होती. तिने सलग दोन दिवस काम केले. त्यानंतर तिच्या घरात निधन झाल्याचे सांगत तिने अचानक कामावर येणे बंद केले. त्यामुळे तिच्यावर कोणालाही सुरुवातीला संशय आला नव्हता.
advertisement
1 जानेवारी रोजी तक्रारदार महिलेच्या वडिलांनी ड्रॉईंग रूममधील दागिन्यांचा बॉक्स उघडून पाहिला. मात्र त्यामध्ये सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी तात्काळ आपल्या मुलीला याबाबत माहिती दिली.
त्यानंतर तक्रारदार महिला घरी आल्यानंतर तिने संपूर्ण बॉक्स तपासला,त्यावेळी सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांना समजले, या घटनेनंतर तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयित मोलकरणीचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.
