अखेर घेण्यात आला 'तो' निर्णय
एल्फिन्स्टन रेल्वे पूल पाडल्यानंतर मध्य रेल्वेने परळ ते प्रभादेवी दरम्यानच्या नव्या पादचारी पुलाला ना-तिकीट क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना आणि नियमित प्रवाशांना आता स्थानकांदरम्यान सहजपणे ये-जा करता येणार आहे.
वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या कामासाठी एमएमआरडीएने एल्फिन्स्टन पूल पाडण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे 10 सप्टेंबरपासून हा पूल तसेच त्यावरील पादचारी मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आली होती. यामुळे परळ आणि प्रभादेवी दरम्यान असलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
advertisement
या पार्श्वभूमीवर महारेल या कंपनीने 6 सप्टेंबर रोजी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून परळ आणि प्रभादेवी स्थानकांना जोडणारा पादचारी पूल ना-तिकीट क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. या मागणीला वेग देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक पदाधिकारी मंगेश कसालकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
शेवटी रेल्वे प्रशासनाने स्थानिकांच्या अडचणीची दखल घेत हा पूल ना-तिकीट क्षेत्र म्हणून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रवाशांनी या पुलावरून थेट फलाटांवर उतरू नये, अशी स्पष्ट सूचना रेल्वेकडून करण्यात आली आहे. सार्वजनिक फलकांद्वारे ही माहिती प्रवाशांना देण्यात आली असून, यामुळे परिसरातील रहिवाशांना आता मोठा दिलासा मिळाला आहे
