मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे 2050 कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. यातील अनेक रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण टप्प्याटप्प्याने केले जात आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश रस्त्यांना अधिक टिकाऊ बनवणे आणि पावसाळ्यात किंवा वाहनचालकांच्या सतत वापरामुळे निर्माण होणाऱ्या खड्ड्यांपासून मुक्त ठेवणे हा आहे. विशेषतहा मुंबईत वाहतुकीचा दडपण मोठा असल्याने रस्त्यांची गुणवत्ता कायम राखणे अत्यंत गरजेचे ठरते.
advertisement
मुंबईत असलेल्या दोन प्रमुख द्रुतगती महामार्गांपैकी पश्चिम द्रुतगती महामार्गाची लांबी 25.33 कि.मी. असून, हा माहीम ते दहिसरपर्यंत जातो. तर पूर्व द्रुतगती महामार्ग 18.75 कि.मी. लांबीचा असून सायन ते मुलुंड चेकनाकापर्यंत पोहोचतो. या दोन्ही महामार्गांची देखभाल पूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे होती, परंतु नोव्हेंबर 2022 मध्ये ही जबाबदारी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे या महामार्गांची देखभाल, दुरुस्ती आणि सतत गुणवत्ता तपासणी आता पालिकेकडेच होत आहे.
महामार्गाच्या दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणावर राबवण्यासाठी महापालिकेने तब्बल 274 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पूर्व द्रुतगती महामार्गासाठी 82 कोटी रुपये तर पश्चिम द्रुतगती महामार्गासाठी 192 कोटी रुपये राखीव आहेत. रस्ते विभागाकडून सांगण्यात आले की, या निधीचा उपयोग रस्त्यांच्या दुरुस्ती, पावसाळी सुरक्षा उपाय, खड्डे भरणे आणि रस्त्याच्या सतत देखभालीसाठी केला जाईल.
तज्ज्ञांच्या मदतीने रस्त्यांची दर्जेदार तपासणी केल्यामुळे महामार्गांचा दीर्घकालीन टिकाव वाढेल. यामुळे वाहनचालकांना सुरक्षित प्रवास, वाहतुकीची सुरळीतता आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा धोका कमी होईल. मुंबई महापालिकेची ही योजना शहराच्या रस्त्यांच्या व्यवस्थापनात एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, ज्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी बनेल.