लिओनेल मेस्सी तब्बल 14 वर्षांपूर्वी म्हणजे 2011 ला भारतात आला होता. पण तो पुन्हा भारत दौऱ्यावर आला असून त्याच्या उपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. आज मुंबईतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष सुरक्षा आणि वाहतूक नियोजन जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रवाशांनी आधीच प्रवासाचे योग्य नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
मेस्सीच्या कार्यक्रमामुळे वाहतुकीत मोठा बदल
वानखेडे स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियम येथे होणाऱ्या कार्यक्रमामुळे संध्याकाळी 5 वाजल्यानंतर दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव काही रस्त्यांवर तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सी, डी, ई, एफ, जी रोड, वीर नरिमन रोड, दिनशा वाच्छा रोड, जमशेदजी टाटा रोड आणि एन.एस. रोडवर वाहतूक नियंत्रण राहणार आहे तसेच डी रोड (पश्चिम-पूर्व), ई रोड (दक्षिण दिशेने) आणि वीर नरिमन रोडवर एकतर्फी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.
कोस्टल रोड (मरीन ड्राइव्ह–वरळी/तारदेव) तसेच चंद्र बोस रोडवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून महत्त्वाच्या चौकांवर पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने स्टेडियम परिसरात पार्किंगला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र चर्चगेट, एच.टी. पारेख मार्ग, दोराबजी टाटा रोड, जमनालाल बजाज मार्ग आणि विधान भवन परिसरात 'पे अँड पार्क' सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, जागा मर्यादित असणार आहे.
किती काळासाठी हा बदल असणार?
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला दिला असून ही वाहतूक व्यवस्था दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
